इस्लामपूर जायंट्सच्या माध्यमातून दुसरे देहदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:47 PM2019-07-19T23:47:56+5:302019-07-19T23:48:01+5:30
जितेंद्र येवले । लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : ‘मरावे परी अवयवरुपी उरावे’ हा संदेश घेऊन सामाजिक चळवळीत सक्रिय असलेल्या ...
जितेंद्र येवले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : ‘मरावे परी अवयवरुपी उरावे’ हा संदेश घेऊन सामाजिक चळवळीत सक्रिय असलेल्या जायंट्स गु्रपच्या माध्यमातून इस्लामपूर शहरात २०१४ मध्ये पहिले देहदान झाले होते. त्यानंतर आता महादेवनगरातील आदर्श शिक्षक नारायण दुधाप्पा बिर्जे (वय ६९) यांचे गुरुवार, दि. १८ रोजी दुसरे देहदान करण्यात यश मिळाले. २०१४ मध्ये डॉ. जैना शहा यांच्या सहकार्याने कल्पना चव्हाण यांचे शहरात प्रथम देहदान झाले होते.
इस्लामपूर शहरात २०१२ पासून जायंट्स गु्रपने नेत्रदान व देहदान चळवळीला सुरु केली. आतापर्यंत शहरातील ११० नागरिकांनी नेत्रदान केले आहे, तर २०१४ मध्ये कल्पना चव्हाण यांनी पहिले देहदान केले होते. ही देहदानाची चळवळ आणखी गतिमान करण्यासाठी जायंट्स वेल्फेअर फौंडेशनचे फेडरेशन डायरेक्टर भूषण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली जायंट्स गु्रप आॅफ इस्लामपूर सहेलीने पुढाकार घेतला आहे. फेबु्रवारी २०१९ पासून अध्यक्षा श्रध्दा कुलकर्णी, चारुशिला फल्ले, डॉ. अनिता पाटील, डॉ. सोनल शहा, प्रतिभा शहा, संगीता शहा, कविता शहा यांनी ‘हो मी अवयव दान करणार’ ही संकल्पना पुढे आणली आहे. आतापर्यंत ६०० नागरिकांनी स्वाक्षरी देऊन पाठिंबा दर्शवला आहे. डॉ. रुजूता टिळे, डॉ. अश्विनी पाटील या देहदानावर व्याख्यान देत आहेत.
महादेवनगरातील नारायण बिर्जे यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांनी जायंट्सच्या माध्यमातून निधनापूर्वीच नेत्रदान व देहदानाची सर्व तरतूद केली होती. त्यानुसार त्यांचा मुलगा प्रा. किरण बिर्जे यांनी वडिलांचे देहदान कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट, कºहाड येथे केले. प्रा. बिर्जे यांनी वडिलांच्या निधनानंतर जायंट्स गु्रप आॅफ इस्लामपूरशी संपर्क साधला. आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण करुन दृष्टिदान हे सांगली येथील नेत्र पेढीकडे, तर कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टला देहदान केले.
हे करणार देहदान...
जायंट्सच्या देहदान या उपक्रमाला आता चांगलीच गती आली आहे. ६ जणांनी देहदान करण्यासाठीची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली आहे. यामध्ये गांधी चौकातील कुसुम जगन्नाथ चटणे, अंबाबाई मंदिर परिसरातील श्रीमती शालन ज्ञानदेव साळुुंखे, गणेश भाजी मंडईजवळील कृष्णाजी वसंतराव पत्की व त्यांच्या पत्नी सुधा कृष्णाजी पत्की हे दाम्पत्य, उरुण परिसरातील इंदुबाई माने, लाल चौकातील श्रीमती प्रमिला कारंजकर, शिराळा येथील लक्ष्मी आनंदा कदम यांनी देहदानाचा संकल्प केला आहे.
नेत्रदान व देहदान
यंग जायंट्स सहेलीच्या अध्यक्षा डॉ. सुरभी सर्जेराव यादव यांच्या माध्यमातून नारायण बिर्जे यांचे पहिले नेत्रदान झाले. त्यांनी नेत्रदान आणि देहदान या उपक्रमासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले आहे.