‘हुतात्मा’कडून दुसरा हप्ता जुलैमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:32 AM2021-06-09T04:32:38+5:302021-06-09T04:32:38+5:30
वाळवा : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याचे २०२०-२१च्या गळीत हंगामातील ऊसाची एफ. आर. ...
वाळवा : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याचे २०२०-२१च्या गळीत हंगामातील ऊसाची एफ. आर. पी.प्रमाणे शेतकऱ्यांना बिले दिली जात आहेत. पहिला हप्ता सर्व शेतकऱ्यांना मिळाला असून, दुसरा हप्ता जुलैमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती हुतात्मा कारखान्याचे कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी सोमवारी दिली.
ते म्हणाले की, गेल्या तीन गळीत हंगामात देशभरात जादा साखर उत्पादन झाल्यामुळे साखर कारखान्यांसमोर शिल्लक साखरेचेच मोठे आव्हान आहे. साखरेला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपीची रक्कमे देण्यात खूप अडचणी येत आहेत. साखरेची मागणी कमी आणि पुरवठा जास्त यामुळे दिवसेंदिवस साखरेचे दर घसरत चालले आहेत. कोरोना महामारीमुळे बँकांचे व्यवहार ठप्प असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शेतीची मशागत, खरिपाची पेरणी तोंडावर आल्याने हुतात्माच्या प्रथेप्रमाणे जमा असणाऱ्या ठेवीवरील व्याज दि. ५ जून २०२१ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेले आहे. तसेच जुलै महिन्यात ऊस उत्पादकांना दुसरा हप्ता देण्यात येणार आहे. केंद्र शासनाने एम. एस. पी.त वाढ न करणे, निर्यात साखरेचे अनुदान मिळाले नाही, बफर स्टॉक नाही, या सर्व धोरणांचा साखर उद्योगावर परिणाम झाला आहे. यामुळेच एकरकमी एफआरपी देण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत, असेही माने यांनी सांगितले.
यावेळी कारखान्याचे चिफ केमिस्ट बी. एस. माने, चिफ अकाऊंटंट एस. बी. बोराटे उपस्थित होते.
चौकट
नागनाथअण्णांच्या तत्त्वावर चालणारा कारखाना
क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णांचे नेतृत्वाखाली उभारलेला हा कारखाना शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगारांच्या हिताचे धोरण राबवत आहे. साखर उद्योगामध्ये ऊस दराची स्पर्धा निर्माण केली आहे. उच्चांकी ऊस दर देण्याचा हुतात्मा पॅटर्न आजही देशभर प्रसिध्द आहे. कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे काम उत्तम पध्दतीने सुरु आहे, असा विश्वासही माने यांनी व्यक्त केला.