कडेगाव तालुक्यात स्वाइन फ्लूचा दुसरा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 11:41 AM2018-09-16T11:41:04+5:302018-09-16T11:50:55+5:30
चिंचणी येथील जयसिंग बाबुराव पाटील (65) यांचा कराड येथील खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे.
कडेगाव (सांगली) : मागील आठवड्यातच स्वाइन फ्लूने वांगी (ता. कडेगाव) येथील आनंदराव यशवंत बोडरे यांच्या मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कडेगाव तालुक्यात स्वाइन फ्लूचा दुसरा बळी गेला आहे. चिंचणी येथील जयसिंग बाबुराव पाटील (65) यांचा शनिवारी (15 सप्टेंबर) सायंकाळी कराड येथील खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. कडेगाव तालुक्यात स्वाइन फ्लूचा दुसरा बळी गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चिंचणी येथे राहणाऱ्या जयसिंग बाबुराव पाटील यांना ताप, खोकला व सर्दी येऊ लागल्याने तसेच धाप लागत असल्याने त्यांना चिंचणी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्या घशातील द्रव स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी विषाणुविज्ञान प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्यामध्ये त्यांचा एच 1-एन 1 म्हणजेच स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान आरोग्य विभागाने याकडे लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना तातडीने करणे गरजेचे आहे.