कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डिप्रेशन वाढले, औषधांची विक्रीही वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:18 AM2021-06-22T04:18:33+5:302021-06-22T04:18:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना व लॉकडाऊन काळात सर्वसामान्य माणसाच्या मागे संकटांचा ससेमिरा लागला. रोजगार गेला, उत्पन्नाचे स्रोत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना व लॉकडाऊन काळात सर्वसामान्य माणसाच्या मागे संकटांचा ससेमिरा लागला. रोजगार गेला, उत्पन्नाचे स्रोत थांबले, कोरोनामुळे जवळच्या व्यक्ती सोडून गेल्या. वैद्यकीय खर्चापोटी लाखोंच्या कर्जाचा डोंगरही झाला. या कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता नसणाऱ्या व्यक्ती नैराश्याने ग्रस्त झाल्या. त्यातूनच गेल्या दीड वर्षात डिप्रेशनच्या औषधांची विक्री लक्षणीय प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे.
औषध विक्रेत्यांच्या उलाढालीसंदर्भात आढावा घेतला असता, त्यांच्या विक्रीमध्ये डिप्रेशनच्या औषधांचा वाटा मोठा असल्याचे दिसून येते. यामध्ये फक्त एका विशिष्ठ वयोगटाचीच माणसे नाहीत. सळसळत्या रक्ताच्या तरुणांपासून वयोमानाने खंगलेल्या आजी-आजोबांपर्यंत अनेकजण डिप्रेशनखाली गेले आहेत. कोरोनाने जवळच्या नातेवाईकांचे झालेले मृत्यू त्यांच्या मनावर आघात करुन गेले आहेत. त्यामुळे मानसोपचार तज्ज्ञांना चिंतेत टाकले आहे. नैराश्यग्रस्त माणसे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याने चिंतेत भर पडली आहे.
रोजगाराची साधने हरवल्याने निराश होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यावरील औषधांसाठी गर्दी केलेल्या तरुणाईला उद्याची चिंता भेडसावत असल्याचे आढळले. पुणे-बेंगलोरमधील बड्या पगाराच्या नोकऱ्या गमावल्यानेही अनेकांची झोप उडाली. बाजारपेठा बंद असल्याने शेतमालाचे काय करायचे? या चिंतेतून शेतकरीही निराशाग्रस्त झाले. त्यांनी झोपेच्या गोळ्यांचा आधार घेतला.
बॉक्स
संवाद साधा, छंदाकडे वळा
- मानसोपचार तज्ज्ञांच्या मते नैराश्य भावनेतून व्यक्ती आत्महत्येकडे वळण्याची भीती असते. निराशेची भावना दररोज थोडी-थोडी रुजत असते. अशावेळी कुटुंबाचा भावनिक आधार महत्त्वाचा ठरतो.
- नैराश्यग्रस्त व्यक्तीचे एकटे पडणे धोकादायक ठरु शकते. यासाठी त्याच्याबरोबर सततचा संवाद कुटुंबीयांनी राखला पाहिजे. मोकळ्या होणाऱ्या मनातूनच आत्महत्येच्या भावनांचा निचरा होऊ शकतो.
- झोपेच्या गोळ्या, मद्य, डिप्रेशनच्या औषधांचा सततचा वापर यापासून त्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजपासून धडे घेणे बंद केले पाहिजे.
बॉक्स
रोजगार गेला, रक्ताचे नातेवाईकही गेले
- रोजगार आणि उत्पन्नाचे स्रोत थांबल्याने सर्वाधिक लोकांना नैराश्याने ग्रासले. विशेषत: रोजंदारीवर काम करणाऱ्यांना उद्या काय ही चिंता भेडसावत राहिली. दररोज उगवणारा दिवस नवे प्रश्न घेऊन येत होता.
- काहींच्या घरातील कर्त्या व्यक्ती कोरोनाने हिरावून नेल्या. त्यांच्यापुढे भवितव्याची मोठी चिंता आहे. कमाई थांबल्याने जगण्याचा, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळेही निराशेने घेरले आहे.
- व्यावसायिकांना मंदीची भीती भेडसावत आहे. कर्जाचे थकलेेले हप्ते, व्याजाचा डोंगर वाढत आहे. कर्मचाऱ्यांना वेतन दिले नाही तर ते सोडून जातील, त्यानंतर पुन्हा व्यवसाय उभारणे म्हणजे अडचणींचा डोंगर ठरणार आहे.
बॉक्स
डिप्रेशनच्या औषधांची लाट
या काळात डिप्रेशनवरील औषधांची विक्री प्रचंड वाढल्याचे औषध विक्रेत्यांनी सांगितले. झोप न येणे, डोकेदुखी, पोटदुखी, अंगदुखी या नेहमीच्या औषधांना मागणी वाढली. डिप्रेशनवरील काही औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय दिली जात नाहीत, त्यामुळे डॉक्टरांची ओपीडीही अशा रुग्णांमुळे वाढल्याचे दिसून आले. विस्मरण, भीती, छातीत धडधडणे, चक्कर येणे, रक्तदाब वाढणे या विकारांचे रुग्णही वाढले, त्यामुळे त्यावरील औषध विक्रीही वाढली.
कोट
कोरोना काळात निराशेची भावना टोकाला पोहोचल्याची उदाहरणे आहेत. नकारात्मक संदेश, नकारात्मक घडामोडी यामुळे या माणसांचा कुटुंबाशी संवाद तोडण्याकडे कल असतो. अशा व्यक्तींसाठी कुटुंबीयांचा आधार अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यांच्याशी सतत संवाद साधल्यास भावना मोकळ्या होतात. निराशेच्या गर्तेतून ते बाहेर येऊ शकतात.
- कालिदास पाटील, मानसोपचार तज्ज्ञ.
कोरोनाच्या संकटाने सर्वांनाच घेरले आहे. अशास्थितीत मानसिकदृष्ट्या दृढ राहण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. शरिराच्या व्यायामासोबतच मनाचा व्यायामदेखील महत्त्वाचा आहे. वाचन, संगीत ऐकणे, छंद जोपासणे, कुटुंबाशी सतत संवाद साधणे हे त्यापैकीच काही मानसिक व्यायाम आहेत. सोशल मीडियावरील नकारात्मक लाटेपासून दूर राहणे कधीही चांगले. योग्य मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे.
- डॉ. आर. के. कुडाळकर, मानसोपचार तज्ज्ञ.