गायब फायलीचे रहस्य आणखी गडद
By admin | Published: January 12, 2016 12:18 AM2016-01-12T00:18:38+5:302016-01-12T00:42:02+5:30
अजूनही पत्ता नाही : महापालिकेतील पदाधिकाऱ्यांत कलगीतुरा रंगला
सांगली : कोल्हापूर रस्त्यावरील दोन एकर जागेवरील प्ले ग्राऊंडचे आरक्षण उठविण्यासंदर्भातील फाईल पाच दिवसांपासून गायब आहे. अजूनही या फायलीचा पत्ता लागलेला नाही. नगररचनाकारांनी संबंधित फाईल महापौरांकडे असल्याचा खुलासा केल्याचा दावा विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत केला, तर महापौरांनी सूर्यवंशी यांचा दावा फेटाळत, ही फाईल आपल्याकडे नसल्याचे सांगितले. या प्रकाराने गायब फायलीचे रहस्य आणखीनच गडद होत आहे.
कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणीच्या मागील बाजूस महापालिकेच्या दहा एकर भूखंडावर प्ले ग्राऊंडचे आरक्षण आहे. सध्या हा भाग रहिवासी क्षेत्रात समाविष्ट झाला असला तरी, काही भाग अजूनही हिरव्या पट्ट्यात आहे. महापालिकेने काही मालमत्ताधारकांना गुंठेवारी नियमितीकरणांतर्गत प्रमाणपत्रेही दिली आहेत. आता प्ले ग्राऊंडच्या जागेवरील आरक्षण उठविण्याचा ठराव करण्यात आल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. त्यासाठी नगरसेवकांचे खिसे गरम करण्यात आले आहेत. हे आरक्षण उठविण्यास काही नगरसेवकांनी विरोध करण्याची भूमिका घेतली आहे.
या नगरसेवकांनी आरक्षणासंदर्भातील फायलीची नगररचनाकडे मागणी केली. पण गेले पाच दिवस नगररचना विभागाने फाईल देण्यास टाळाटाळ केली आहे. कधी महापौरांच्या, तर कधी उपायुक्तांच्या कस्टडीत ही फाईल असल्याचे सांगितले जात आहे.
सोमवारी विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी नगररचनाकार काकडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून फायलची मागणी केली. त्यावर त्यांनी माझ्याकडे फाईल नसून ती महापौरांकडे असल्याचे सांगितले. सूर्यवंशी यांनी दूरध्वनीवरील संभाषणच पत्रकारांना ऐकविले. याबाबत महापौर विवेक कांबळे यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधला असता, त्यांनी सूर्यवंशींचा दावा फेटाळला. महासभेत आरक्षण उठविण्याचा कोणताही ठराव झालेला नाही. संबंधित फाईलही माझ्याकडे नाही. त्यामुळे मी या विषयावर अधिक काय सांगणार, अशी बाजू त्यांनी मांडली. महापौर व विरोधी पक्षनेत्यांत फायलीवरून कलगीतुरा रंगला असला तरी, ही फाईल नेमकी कुठे आहे? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
आयुक्तांकडून ही फाईल उपायुक्तांकडे गेल्याचे काहीजण सांगतात, तर काहीजण महापौरांकडे बोट दाखवितात. (प्रतिनिधी)
कोल्हापूर रस्त्यावरील आरक्षित भूखंडाबाबत आपल्याकडे प्रस्ताव आलेला नाही. महासभेतही असा कोणताही ठराव झालेला नाही. त्यामुळे त्यावर अधिक बोलणे उचित राहणार नाही. आपणही या भूखंडाबाबत वृत्तपत्रातून वाचले आहे. आयुक्तांनी आरक्षण उठविण्यास मान्यता दिल्याचे बातमीतून समजले. ही फाईल माझ्याकडे आल्यानंतर त्यावर अभ्यास करून निर्णय घेऊ.
- विवेक कांबळे, महापौर
नगररचनाकडे फायलीची मागणी केली, पण त्यांनी अद्याप ती दिलेली नाही. ही नगररचनाकारांची बेफिकिरी आहे. त्यांच्याकडून फाईल गायब होते. याबाबत नगरविकास विभाग व विभागीय आयुक्तांकडे तक्रार करणार आहोत. जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेऊन ठराव मंजूर न करण्याची विनंती केली आहे. महासभेतही अशा ठरावाला आम्ही विरोध करू
- दिग्विजय सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते