देशाच्या अखंडतेसाठी धर्मनिरपेक्षता आवश्यकच
By admin | Published: June 5, 2016 12:52 AM2016-06-05T00:52:17+5:302016-06-05T00:54:44+5:30
अब्दुल कादर मुकादम : सांगलीत सेक्युलर मुव्हमेंटच्या राज्यस्तरीय अधिवेशनास सुरुवात
सांगली : भारत-पाकिस्तानच्या निर्मितीवेळी पाकिस्तानने धर्माधिष्ठित विचारप्रणालीचा स्वीकार केला, तर भारताने धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व अंगिकारले. कारण हिंदू राष्ट्रापेक्षा देशात धर्मनिरपेक्षता असणे गरजेचे आहे. आता काहींकडून असा प्रयत्न चालवला जात असून, देश संपून जाण्याची भीती नाकारता येत नाही. देशाच्या अखंडतेसाठी धर्मनिरपेक्षता तत्त्व आवश्यक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अब्दुल कादर मुकादम यांनी शनिवारी केले.
येथील शांतिनिकेतन परिसरात शनिवारपासून ‘सेक्युलर मुव्हमेंट’च्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनास प्रारंभ झाला. अधिवेशनाच्या उद्घाटनावेळी मुकादम बोलत होते. यावेळी सेक्युलर मुव्हमेंटचे मुख्य संघटक प्रा. गौतमीपुत्र कांबळे, स्वागताध्यक्ष प्रा. मिलिंद वडमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुकादम म्हणाले की, देशातील सध्याचे प्रवाह सर्वच घटकांना विचार करायला लावणारे आहेत. सध्या काहीजणांकडून भारताला हिंदूराष्ट्र करण्याबाबत चर्चा करण्यात येत असली, तरी देशाच्या अखंडतेसाठी हा विचार घातक आहे. कारण या देशातील विविध जाती-धर्मांचा समाज लक्षात घेता धर्मनिरपेक्षता असणे गरजेचे आहे. अखंड भारतातून भारत आणि पाकिस्तान या दोन देशांची निर्मिती झाली, त्यावेळी पाकिस्तानची मुस्लिम राष्ट्र म्हणून निर्मिती झाल्यानंतरच हिंदू राष्ट्र म्हणून निर्मिती होऊ शकली असती, पण ते झाले नाही. कारण हा देश धर्मनिरपेक्ष असणेच आवश्यक आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्र म्हणून निर्मितीचा प्रयत्न झाला तर देशच संपून जाण्याची भीती आहे.
मुकादम म्हणाले की, संघाला आंबेडकर हवे आहेत, मात्र याच आंबेडकरांनी तयार केलेली घटना त्यांना नको आहे. फक्त स्वत:च्या स्वार्थासाठीच त्यांच्या नावाचा वापर करण्यात येत आहे. देशात समान नागरी कायदा यायला पाहिजे ही आमचीही मागणी आहे. पण कोणत्याही राजकीय पक्षाला समान नागरी कायदा नको आहे. हा कायदा झाला, तर एकप्रकारे धर्मनिरपेक्ष तत्त्वाच्या मुद्द्याला बळच मिळणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. गौतमीपुत्र कांबळे म्हणाले की, उजव्या आणि डाव्या या दोन्ही विचारसरणीचे विचार देशाला घातकच आहेत. उजव्या विचारसरणीचा स्वीकार करणाऱ्यांना घटना मान्य नाही, तर डाव्यांमध्येही जातीयवाद आहे. इतरवेळी पुढे असणारे डावे मनुस्मृती दहनावेळी मागे का असतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावेळी स्वागताध्यक्ष प्रा. मिलिंद वडमारे, सुरेश कुडाळे, आगरी कोळी समाजाचे नेते राजाराम पाटील, गणेश पवार, संग्राम सावंत, तुका कोचे, मुव्हमेंटच्या राज्य संघटक अवंतिका कवाळे, महेंद्र कांबळे, दिलीप सासणे, कैलास काळे, सिध्दार्थ कांबळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)