धर्मनिरपेक्षता बाजूला करून नास्तिकताच स्वीकारायला हवी, तुषार गांधी यांनी व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 11:59 AM2023-09-20T11:59:33+5:302023-09-20T12:26:55+5:30

सांगलीत दहाव्या नास्तिक परिषदेत धर्मांधतेवर टीकास्र

Secularism should be left aside and atheism should be accepted, Tushar Gandhi expressed his opinion | धर्मनिरपेक्षता बाजूला करून नास्तिकताच स्वीकारायला हवी, तुषार गांधी यांनी व्यक्त केलं मत

धर्मनिरपेक्षता बाजूला करून नास्तिकताच स्वीकारायला हवी, तुषार गांधी यांनी व्यक्त केलं मत

googlenewsNext

सांगली : देशात धर्मांधतेलाच धर्म मानून प्रतिगामी शक्ती गांधी, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा पराभव करण्यास सरसावली आहे. देशाच्या घटनेत धर्मनिरपेक्षता मांडली असली, तरी आताच्या स्थितीत धर्मनिरपेक्षताही बाजूला करून केवळ नास्तिकताच स्वीकारायला हवी, असे मत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केले.

ब्राइट सोसायटीच्या वतीने सांगलीत दहावी नास्तिक परिषद पार पडली. या परिषदेचे उद्घाटन गांधी यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ विचारवंत व लेखक जावेद अख्तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तुषार गांधी म्हणाले, अहिंसा तर जपलीच पाहिजे; पण त्यापुढे जाऊन धर्मविरहित एक नवी प्रणाली अस्तित्वात आणली पाहिजे.

धर्ममार्तंडांना नाकाम करण्यासाठी ती प्रभावी ठरेल. देशातील प्रतिगामी शक्तींना समाजातून मोठे बळ मिळत आहे. नास्तिकतेचा प्रचार व प्रसार न केल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे समाजाला नास्तिकतेच्या दिशेने आपण घेऊन गेले पाहिजे.

सध्या भारतात धर्माचा वापर करून ज्या काही घटना घडत आहेत, ते पाहिले की आपला राष्ट्र आता धर्मनिरपेक्ष राहिला नाही, हे स्पष्ट होते. राजस्थानमध्ये ९ वर्षांच्या दलित मुलाने मटक्यातून पाणी घेतल्याच्या रागातून त्याची अमानुष हत्या केली जाते. मणिपूरमध्ये महिलांवर अमानुष अत्याचार झाल्यानंतरही आपल्याला त्याबाबत काहीही कळत नाही. मध्य प्रदेशमध्ये एकाने आदिवासी दलित मुलाच्या डोक्यावर लघुशंका केली. या घटना पाहून भारतीयांचे रक्त कसे उसळत नाही, असा सवालही गांधी यांनी उपस्थित केला.

जावेद अख्तर म्हणाले की, श्रद्धाळू लोकांना मूर्ख बनवून स्वत:चा फायदा करून घेतला जातो. धर्मातील अतार्किक गोष्टी स्वीकारल्यामुळे लोक विचार करू शकत नाहीत. धर्मात स्वर्ग-नरकाच्या कल्पना, मेल्यानंतर सर्व काही मिळेल, अशा अतार्किक गोष्टींचा वापर अत्यंत हुशारीने राजकीय लोक करतात. परमेश्वराशिवाय जगात पत्ताही हालत नाही, असे धर्मात म्हटले आहे; पण लोकांवर अन्याय, अत्याचार, खून, बलात्कार या गोष्टी परमेश्वर का थांबवू शकत नाही, असा साधा विचारही माणूस करीत नाही. हे सर्व घडताना परमेश्वराला लाज कशी वाटत नाही, असा प्रश्नही पडत नाही.

ब्राइट सोसायटीचे सचिव कुमार नागे यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष प्रमोद सहस्रबुद्धे यांनी ब्राइट सोसायटीची उद्दिष्टे मांडली. चंद्रकांत शिंदे यांनी आभार मानले. डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाची सुरुवात सलीम मोमीन यांचे सहकारी समुवेल घाटगे, महेश नवाळे, गणेश बिरनाळे यांनी क्रांती गीतांनी केली.

धर्मातूनच हुकूमशाहीचा जन्म : जावेद अख्तर

आस्तिकता व नास्तिकता या दोन्हींमध्ये कट्टरता निर्माण होऊ शकते. मात्र, श्रेष्ठत्वाच्या लढाईमुळे धर्म माणसाला विवेकवादाकडे, मूल्यवादी रचनेकडे नेऊ शकत नाही. धर्मातून धर्मांधता व त्यानंतर हुकूमशाहीचा जन्म होतो. नास्तिकताच मूल्यवादी रचना निर्माण करू शकते. त्यामुळे नास्तिकतेकडे समाजाने नकारात्मक दृष्टीने पाहू नये.

नास्तिकता आमच्या घरातच!

माझा नास्तिकतेचा प्रवास याविषयी बोलताना जावेद अख्तर म्हणाले की, माझा जन्म झाल्यानंतर माझ्या वडिलांनी माझ्या कानात ‘कम्युनिस्ट मॅनिफिस्टो’ म्हटले होते. माझे नावही ‘जादू’ असे ठेवले होते. त्यामुळे नास्तिकता ही आमच्या घरामध्येच होती.

हे राम ते नो राम : तुषार गांधींचा प्रवास

तुषार गांधी म्हणाले, मला महात्मा गांधी यांचा पणतू म्हणून ओळखतात. गांधीजी धार्मिक होते; परंतु मी तर स्वत: गांधीजींची बिघडी हुई औलाद समजतो. गांधीजींबद्दल वाचत असताना त्यावेळी नास्तिक विचारांचे आंध्र प्रदेशमधील गोरा आणि बापू यांची चर्चा होत असल्याचे दिसले. नास्तिक विचार हा मी लहानपणापासून वाचत आलो आहे. तो आता रुजला आहे.

Web Title: Secularism should be left aside and atheism should be accepted, Tushar Gandhi expressed his opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली