सिकंदराबाद-कोल्हापूर उन्हाळी विशेष रेल्वे सुरू होणार; सांगलीकरांची सोय
By श्रीनिवास नागे | Published: May 16, 2023 03:01 PM2023-05-16T15:01:29+5:302023-05-16T15:02:08+5:30
मिरजेत सकाळी साडेसात वाजता व कोल्हापूर येथे रविवारी सकाळी नऊ वाजता पोहोचेल.
मिरज : सिकंदराबाद ते कोल्हापूर उन्हाळी विशेष रेल्वे दि. ३ जूनपासून आठवड्यातून एकदा सुरू होणार आहे. या विशेष रेल्वेमुळे दक्षिण भारतात जाणाऱ्या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार आहे. विशेष रेल्वे दर शनिवारी सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी सिकंदराबाद येथून सुटेल. वाडी येथे रात्री अकरा वाजता, कलबुर्गी य़ेथे रात्री बारा वाजून दहा मिनिटांनी, कुर्डूवाडी येथे रात्री तीन वाजून वीस मिनिटांनी, मिरजेत सकाळी साडेसात वाजता व कोल्हापूर येथे रविवारी सकाळी नऊ वाजता पोहोचेल.
ती परतीच्या प्रवासासाठी कोल्हापुरातून रविवारी सायंकाळी सहा वाजता सुटणार आहे. मिरजेत सायंकाळी सात वाजता, कुर्डूवाडी येथे रात्री अकरा वाजता, कलबुर्गी येथे पहाटे तीन वाजता, वाडी येथे पहाटे सव्वाचार वाजता व सिकंदराबाद येथे सोमवारी सकाळी पावणेनऊ वाजता पोहोचेल. विशेष रेल्वेच्या दि. ३ ते २४ जून या कालावधीत चार फेऱ्या होणार आहेत. सध्या बेळगावातून सिकंदराबादला जाणाऱ्या गाडीला अठरा तास लागतात. मात्र सोलापूरमार्गे धावणाऱ्या या विशेष रेल्वेला १४ तास लागणार असल्याने वेळेची बचत होणार आहे. विशेष रेल्वेस चांगला प्रतिसाद मिळाल्यास ही रेल्वे नियमित सुरू होण्याची शक्यता असल्याचे रेल्वे कृती समितीचे सचिव सुकुमार पाटील यांनी सांगितले.