चांदोली धरण परिसरासह सुरक्षा रक्षकही असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 11:28 PM2017-08-11T23:28:43+5:302017-08-11T23:28:46+5:30

 Security guard with chandoli dam area is also unsafe | चांदोली धरण परिसरासह सुरक्षा रक्षकही असुरक्षित

चांदोली धरण परिसरासह सुरक्षा रक्षकही असुरक्षित

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वारणावती : चांदोली धरणाच्या माथ्यावरचे पथदिवे बंद असल्याने अंधाराचा फायदा घेऊन जलचर प्राणी व चांदोली अभयारण्यातील हिंस्र प्राणी धरणाच्या परिसरात येऊन प्राण्यांवर हल्ले करू लागले आहेत. त्यामुळे धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे. सुरक्षा कर्मचारीच असुरक्षित असल्याचे स्पष्ट होत आहे. धरण प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली धरण ३४.४० टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणारे राज्यातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे. सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांतील सरहद्दीवर ३६७.१७ चौरस किलोमीटरचे क्षेत्र असणारे चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे. अभयारण्यात विविध जातींचे प्राणी, पक्षी, कीटक, विविध प्रकारची फुलपाखरे, सरपटणारे जीव यांचे अस्तित्व आहे. याच अभयारण्यातील गवे, रानडुकरांकडून तालुक्याच्या पश्चिम भागातील सोनवडे, मणदूर, बेरडेवाडी, कोकणेवाडी, मिरुखेवाडी, गुढे पाचगणी परिसर येथील व शाहुवाडी तालुक्यातील उखळू, शितूर, खेडे, शिराळे वारूण या परिसरातील ऊस, भात पिकांचे नुकसान होत आहे. अभयारण्यातील बिबट्यांकडूनही वारंवार हल्ले होत आहेत.
सध्या धरण ९१.८१ टक्के भरले आहे. पावसाचे आगर समजल्या जाणाºया या परिसरात धुवाँधार पाऊस सुरू असतो. त्यामुळे धरण परिसरात सुरक्षा व्यवस्था काटेकोर असणे आवश्यक असते, पण धरणाच्या भिंतीवरील पथदिवे कायम बंदच असतात. गेल्या वर्षभरापासून तक्रारी करूनही वरिष्ठांनी दखल घेतली नाही. धरणाच्या गेटजवळील विद्युतपुरवठा प्रशासनाने वीज बिल न भरल्याने वारंवार खंडित केला जातो. त्यामुळे परिसर नेहमीच अंधारात असतो. याचा फायदा हिंस्र प्राणी घेतात आणि पाळीव प्राण्यांवर हल्ले करतात. अंधाराचे साम्राज्य असल्याने हेच प्राणी धरणाच्या सुरक्षा कर्मचारी व पोलिसांवरही हल्ला करू शकतात.
गुरुवारी पहाटे बिबट्याने वासरावर हल्ला करून त्याला ठार केले. चारच दिवसांपूर्वी धरणाच्या जलाशयातील महाकाय मगर धरणाच्या भिंतीवर आली होती. त्यामुळे धरणावरील कर्मचारी व पोलिस यांच्यात भीतीचे वातावरण आहे. भीतीच्या छायेखालीच ते धरणाची सुरक्षा करतात.

Web Title:  Security guard with chandoli dam area is also unsafe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.