गायकवाड कुटुंबीयांकडून शिराळा नगरपंचायतीस सीड बॉल्स भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:19 AM2021-06-19T04:19:12+5:302021-06-19T04:19:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिराळ्यातील महादेव गायकवाड व कुटुंबीय प्रतिवर्षी गोरिला गार्डनिंग संकल्पनेअंतर्गत लाल मातीपासून वेगवेगळ्या वृक्षांच्या बियांपासून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळ्यातील महादेव गायकवाड व कुटुंबीय प्रतिवर्षी गोरिला गार्डनिंग संकल्पनेअंतर्गत लाल मातीपासून वेगवेगळ्या वृक्षांच्या बियांपासून सीड बॉल्स तयार करतात. या सीड बॉल्सची पावसाळ्याच्या दिवसात डोंगरमाथ्यावर वनराई वाढविण्याच्या सद्भावनेतून लागवड केली जाते. यावर्षी सुमारे ३०० सीड बॉल्स त्यांनी नगरपंचायतीस भेट दिले.
मागील वर्षभरात शिराळा नगरपंचायत प्रशासनाकडून राबविण्यात आलेल्या वेगवेगळ्या पर्यावरणपूरक उपक्रमांचा आढावा व सकारात्मक परिणाम लक्षात घेऊन या कुटुंबाने तयार केलेले सीड बॉल नगरपंचायतीस भेट देण्याचा संकल्प केला. शहर हरित शहर व्हावे, या उद्देशाने श्रीमती बाळाबाई गायकवाड, शीतल गायकवाड व इंद्रनील गायकवाड यांनी घरगुती पारंपरिक पद्धतीने शेण व लाल मातीपासून आंबा, चिंच, जांभूळ, करंजी, खारीक, चिकू या झाडांचे बनविलेले साधारणत: ३०० सीड बॉल्स मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्याकडे सुपूर्त केले.
यावेळी माजी नगराध्यक्षा अर्चना शेटे, कार्यालयीन अधीक्षक सुविधा पाटील, नयना कुंभार, अर्चना गायकवाड, सुभाष इंगवले, प्रकाश शिंदे, तसेच कर्मचारी उपस्थित होते. या पर्यावरणपूरक भेटीबद्दल मुख्याधिकारी पाटील यांनी गायकवाड कुटुंबीयांचे आभार मानले.