ते अनधिकृत बांधकाम पाहून सांगलीतील हमालांनी मारला रस्त्यावरच ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:43 AM2018-12-15T00:43:37+5:302018-12-15T00:44:12+5:30
येथील मार्केट यार्डातील रस्त्यावरच सुरु असलेले बांधकाम शुक्रवारी हमाल बांधवांनी रोखले. कामास अडथळा ठरणारे हे बांधकाम जोवर बंद होत नाही, तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा इशारा हमालांनी दिला. अखेर
सांगली : येथील मार्केट यार्डातील रस्त्यावरच सुरु असलेले बांधकाम शुक्रवारी हमाल बांधवांनी रोखले. कामास अडथळा ठरणारे हे बांधकाम जोवर बंद होत नाही, तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा इशारा हमालांनी दिला. अखेर बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी संबंधितांना बांधकाम थांबविण्याचे आदेश दिल्यानंतर हमालांनी आंदोलन मागे घेतले.
मार्केट यार्डात बाजार समितीच्या अखत्यारीत असणाऱ्या रस्त्याशेजारी कोणतीही परवानगी न घेता बांधकाम होत असल्याचे शुक्रवारी सकाळी हमाल बांधवांच्या निदर्शनास आले. त्यानंतर हमाल पंचायतीचे नेते विकास मगदूम आणि बाजार समितीचे संचालक बाळासाहेब बंडगर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनास सुरूवात करण्यात आली. बांधकाम होत असलेला भाग बाजार समितीच्या मालकीचा आहे.
हे बांधकाम झाल्यास हमालांना गाडीत मालाची उतार करण्यास व चढविण्यास अडचणी येणार आहेत. यामुळे संतप्त हमालांनी अचानक काम बंद आंदोलन केले. बाजार समितीच्या बाहेर ठिय्या मारला होता. जोवर बांधकामावर कारवाई होत नाही, तोवर आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. हमाल बांधवांच्या आक्रमक पवित्र्यामुळे बाजार समिती प्रशासनाने तोडगा काढला. मुख्य रस्त्यावर अनेक व्यापाºयांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे हमाल बांधवांना अडचणी येत असल्याने हे अतिक्रमणही काढावे, अशी मागणी केली. शुक्रवारी काम बंद राहिले असले तरी, शनिवारपासून पूर्ववत कामकाज सुरू होणार आहे.
हळद, गुळाचे सौदे बंद
बांधकामाच्या विरोधात हमाल बांधवांनी काम बंद ठेवल्याने शुक्रवारी हळद, गुळाचे सौदे बंद होते. बाजार समितीच्या प्रशासनाने सायंकाळी सर्वांशी चर्चा करून तोडगा काढला. चर्चेनंतर रस्त्यावर सुरू असलेले बांधकाम थांबविण्याचे आदेश सभापतींनी दिले. संबंधित व्यापाºयांनीही बांधकाम करणार नसल्याचे बैठकीत सांगितले. यावेळी सभापती दिनकर पाटील, सचिव एन. एम. हुल्याळकर आदी उपस्थित होते.