Sangli: मासे विक्रेत्या महिलेच्या लेकीची आयकर विभागात सहायक कर पदी निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 04:44 PM2023-07-22T16:44:08+5:302023-07-22T16:45:48+5:30
घरची परिस्थिती हलाखीची, आईने मासे विक्री करुन कुटुंब चालवले, लेकीने आईच्या कष्टाचे चीज केले
सुरेंद्र दुपटे
संजयनगर : घरची परिस्थिती हलाखीची, वडिलांचे लहाणपणीच छत्र हरवले, आई मासे सुकट, बोंबील, विक्री करुन कुटुंबाचा कसाबसा गाडा चालविते, अशा परिस्थिती जिद्दीने अभ्यास करुन लेकीने स्पर्धा परीक्षेत यश मिळवित आयकर विभागात सहायक कर पदी झेप घेतली. फिरदोस खाटीक हिने पहिल्याच प्रयत्नात मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सांगली शहरातील ५० फुटी रस्त्यांवर असलेल्या विनायकनगर येथे फिरदोस आपल्या कुटुंबांसोबत राहते. लहानपणी वडिलांचे छत्र हरवले. आईने मासे सुकट, बोंबील, विक्री करुन कुटुंबाचा गाडा चालवला. असा परिस्थितीत फिरदोसने कष्ट जिद्दी व चिकाट्टीच्या जोरावर स्पर्धा परिक्षेत यश मिळवले. विशेष म्हणजे तिने पहिल्याच प्रयत्नात आयकर सहायक कर आणि मंत्रालयातील लिपिक पदाच्या दोन्ही परीक्षेत यश मिळवले.
तिला आई, भाऊ यांची मोलाची साथ मिळाली. फिरदोस हिने शिक्षण घेताना कष्ट आणि जिद्द बाळगली. एखादे ध्येय ठरविले तर कोणतीही गोष्ट अवघड नसल्याचे तिने यावेळी सांगितले. तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.