पालकमंत्र्यांकडून स्वार्थी राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 01:06 AM2017-12-05T01:06:43+5:302017-12-05T01:11:15+5:30
जत : मागील साडेतीन वर्षात पालकमंत्री जत येथे आले नाहीत. परंतु नगरपालिका निवडणूक सुरु झाल्यानंतर आठ दिवसात दोन वेळा ते येथे आले आहेत. स्वार्थी हेतू ठेवून केवळ राजकारण करण्यासाठी ते येत आहेत. शहरातील सूज्ञ मतदारांनी त्यांचा हेतू ओळखून मतदान करावे, असे आवाहन प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष विश्वजित कदम यांनी केले.
जत नगरपालिका निवडणूक प्रचारार्थ थोरली वेस जत येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. जत तालुक्यात मागील उन्हाळ्यात ८२ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरु असताना पालकमंत्र्यांनी येऊन आढावा बैठक घेतली नाही. जत नगरपालिकेचे बजेट ५२ कोटी रुपये इतके आहे. परंतु उत्पन्न कमी आहे. येथील विकास कामासाठी आ. मोहनराव कदम यांचा विधानपरिषद निधी वापरुन विकास पूर्ण करु अशी ग्वाही देऊन विश्वजित कदम पुढे म्हणाले की, जत नगरपालिकेचा विकास होऊ नये म्हणून विरोधकांनी येथे काही ठेकेदार कार्यकर्ते जाणीवपूर्वक निर्माण केले. त्यांनी कमी किंमतीची निविदा भरुन इतरांना काम करु दिले नाही असेही त्यांनी सांगितले.
सुरेश शिंदे यांची आम्ही काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करणार होते ते स्वत:हून इतरत्र गेले ते चांगलेच झाले आहे. आता जत तालुका कमिटी काँग्रेस स्वच्छ झाला आहे, असे त्यांनी सांगितले.
विक्रम सावंत म्हणाले की, मागील पाच वर्षात आमच्याकडे बहुमत नव्हते त्यामुळे अपेक्षेप्रमाणे विकास करता आला नाही. आता बहुमत दिल्यास निश्चित विकास करु अशी ग्वाही त्यांनी दिली.
नगराध्यक्ष इकबाल गवंडी म्हणाले, आम्ही भ्रष्टाचार केला असता तर जनतेने त्याचवेळी आम्हाला बाजूला केले असते. सुरेश शिंदे यांनी बुलडोझर लावून जत शहराला लुटले आहे, असा आरोप त्यांनी केला. सुरुवातीस आप्पू बिराजदार यांनी स्वागत केले. यानंतर सुजय शिंदे, मोहन कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बाबासाहेब कोडग, शुभांगी बन्नेनवार, परशुराम मोरे, महादेव कोळी, अॅड. युवराज निकम, रवींद्र सावंत, मनीषा साळे, मंदाकिनी बेळंखी, नंदा व्हनमाने आदी उपस्थित होते. इराण्णा निडोणी यांनी आभार माानले. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित होते.