दिवसात २३०० दुचाकींची विक्री
By admin | Published: March 31, 2017 11:37 PM2017-03-31T23:37:39+5:302017-03-31T23:37:39+5:30
आरटीओ मालामाल : २५ कोटीचा कर शासनाच्या तिजोरीत
सांगली : सर्वोच्च न्यायालयाने बीएस-३ (भारत स्टेज-३) इंजिन प्रकारातील वाहनांवर १ एप्रिलपासून बंदी घातल्यामुळे नामांकित दुचाकी कंपन्यांनी त्यांच्याकडील बीएस-३ प्रकारातील सर्व वाहनांवर केलेल्या सवलतींच्या वर्षावाचा शुक्रवारी शेवटच्यादिवशी नागरिकांनी चांगलाच फायदा उठविला. रात्री बारा वाजेपर्यंत दोन हजार तीनशे वाहनांची विक्री झाली. यातून सुमारे २५ कोटींचा कर आरटीओंच्या तिजोरीत जमा झाला आहे.
सांगली, मिरजेतील अनेक शोरुम्स्मध्ये शुक्रवारी सकाळपासून वाहने खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा लागून राहिल्या होत्या. वाहन खरेदीसाठी पहिल्यांदाच एवढी झुंबड उडाल्याने शोरुम्समधील कर्मचाऱ्यांना गर्दी नियंत्रित करणे मुश्किल झाले. सांगलीतील मिलेनियम होंडा, पट्टणशेट्टी होंडा, पोरेज् टीव्हीएस, मिरजेतील सिद्धिविनायक या शोरुम्समध्ये सवलती सुरू झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत ग्राहकांनी गर्दी केली. मुहूर्तावर होणाऱ्या खरेदीचेही विक्रम शुक्रवारी मोठ्या सवलतींच्या वर्षावाने मोडीत निघाले. दिवसभर शोरुम्सना जत्रेचे स्वरूप होते. वाहने मिळविण्यासाठी ग्राहकांची धडपड सुरू होती. कंपन्यांनी सवलतीचे दर जाहीर केल्याने, ज्याला वाहनाची गरज नाही, त्यांनीही वाहन खरेदी केले. सात हजार रुपयांपासून वीस हजार रुपयांपर्यंतच्या सवलती दुचाकी वाहनांवर होत्या.
शुक्रवारी रात्री बारापर्यंत नोंदणी होणारी वाहनेच पासिंग केली जाणार होती. यासाठी शोरुम मालकही जुन्या गाड्या शिल्लक ठेवणार नव्हते. रात्री बाराच्या ठोक्याला खरेदी व्यवहारावर ३१ मार्च २०१७ ही तारीख टाकण्यासाठी शोरुममधील कर्मचाऱ्यांची धडपड सुरु होती. वाहनांचे पासिंग येत्या दोन-तीन दिवसात करण्यास आरटीओंनी मान्यता दिली आहे. (प्रतिनिधी)