शिराळा तालुक्यात खाद्यतेलाची चढ्या भावाने विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:37 AM2020-12-30T04:37:27+5:302020-12-30T04:37:27+5:30
मंगळवारी शिराळ्यातील घाऊक व्यापाऱ्यांकडे १७०० रुपये किमतीचा तेलाचा १५ लिटरचा डबा होलसेल दरात १९०० रुपयांना विक्री केला जात होता. ...
मंगळवारी शिराळ्यातील घाऊक व्यापाऱ्यांकडे १७०० रुपये किमतीचा तेलाचा १५ लिटरचा डबा होलसेल दरात १९०० रुपयांना विक्री केला जात होता. काही चोखंदळ ग्राहकांनी डब्याच्या एमआरपीकडे व्यापाऱ्याचे लक्ष वेधताच, ‘त्यावर काय छापले याला महत्त्व नाही. आम्ही १९०० रुपयांनाच डबा विकणार आहे. आपणास परवडत नसेल तर आमच्याकडे माल घेऊ नका’, अशी उद्धट उत्तरे देण्यात आली.
दिवाळीनंतर खाद्यतेलाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. सध्या १५ लिटरचा डबा १९०० रुपये, तर १५ किलोचा डबा त्याहूनही अधिक चढ्या भावाने विकला जात आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांची दुकानदारांकडून पिळवणूक होत आहे.
चौकट
ग्राहकांची लूट
कोणतीही वस्तू ग्राहकाला एमआरपीपेक्षा जास्त भावाने कधीच विकता येत नाही. हा ग्राहक संरक्षण कायदा असला तरी, सध्या शिराळ्यातील अनेक घाऊक व्यापारी त्याला हरताळ फासत बिनधास्तपणे सामान्य ग्राहकांची लूट करत आहेत. याबाबत संबंधित विभागाने दुकानदारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. सूर्यफूल, सोयाबीन व शेंगतेल आदी खाद्यतेलाचा ग्रामीण भागामध्ये सर्रास वापर केला जाताे. एखाद्या ग्राहकाने बिल मागितले तर दुकानदार वाद घालत आहेत. किराणा माल व्यवसाय हा विनापावतीच चालत असल्यामुळे पावती मागणाऱ्या ग्राहकांकडे दुकानदार संशयाने पाहत आहेत.
फाेटाे : २९ बिळाशी १