दुष्काळामुळे जनावरांची कवडीमोल दराने विक्री
By admin | Published: March 14, 2016 10:22 PM2016-03-14T22:22:14+5:302016-03-15T00:19:19+5:30
मंदीचे सावट : करगणीत लखमेश्वर यात्रा
करगणी : आटपाडी तालुक्यातील करगणी येथे महाशिवरात्रीनिमित्त लखमेश्वर देवाची यात्रा भरते. यानिमित्त येथे खिलार जनावरांचा मोठा बाजार भरत असतो. मात्र यावर्षी जनावरांच्या बाजारावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. दुष्काळामुळे या बाजारातील जनावरे कवडीमोल दराने विकण्यात आली आहेत. आर्थिक मंदीचे सावट असतानाच यावर्षी बाजाराकडे परराज्यातील व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याने आर्थिक संकट तीव्र झाले आहे. माणदेशातील प्रसिध्द असणारा हा बाजार मोठ्याप्रमाणात भरतो. बाजारातील जनावर खरेदीसाठी महाराष्ट्रसह कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरातसह व्यापारी व शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी सहभागी होत असतात. यमध्ये कोट्यवधी रुपयांंची उलाढाल होत असते. जनावरांच्या बाजारासाठीच ही यात्रा परराज्यात प्रसिध्द आहे.
परिसरातील शेतकऱ्यांची उन्हाळ्यातील शेतीच्या कामासाठी बैलांची गरज असल्याने येथे बैलांची मोठी खरेदी-विक्री होते. मात्र सध्या दुष्काळामुळे जनावरे कवडीमोल भावाने विकली जात असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी आहे. ग्रामपंचायत व बाजार समितीतर्फे पिण्याच्या पाण्याच्या टॅँकरची सोय करण्यात आली आहे. (वार्ताहर)
जनावरांसाठी : २४ तास वैद्यकीय सेवा
करगणी यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरे दाखल होत असल्याने जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू नये यासाठी करगणी पशुवैद्यकीय आरोग्य केंद्रातर्फे २४ तास सेवा देण्यात आली आहे. यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गाडवे व कर्मचारी सेवा देत आहेत. यामुळे परिसरातून या सेवेबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.