खानापूरसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याचा प्रस्ताव पाठवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:21 AM2021-01-14T04:21:51+5:302021-01-14T04:21:51+5:30
खानापूर मतदारसंघाचे आ. अनिल बाबर यांनी आटपाडीला पोलीस ठाण्यासाठी नवीन इमारतीचे बांधकाम आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले खानापूर ...
खानापूर मतदारसंघाचे आ. अनिल बाबर यांनी आटपाडीला पोलीस ठाण्यासाठी नवीन इमारतीचे बांधकाम आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले खानापूर येथे स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी मंत्रालयात गृहराज्यमंत्री देसाई, जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू, आ. अनिल बाबर, आ. प्रकाश आबिटकर, पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिनीन बिहारी, अतिरिक्त पोलीस महासंचालक एस जगन्नाथन यांच्या उपस्थित मंत्रालयात बैठक झाली.
या बैठकीत आ. बाबर यांनी विटा पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या खानापूर पोलीस औट पोस्टच्या कार्यक्षेत्रात पूर्व भागातील २५ ते ३० गावे आहेत. त्यामुळे खानापूरला स्वतंत्र पोलीस ठाण्याची आवश्यकता असल्याने ते मंजूर करावे. तसेच आटपाडी येथे पोलीस ठाण्याची इमारत बांधकामासाठी मंजुरी देण्याची मागणी केली.
त्यावेळी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी ग्रामीण भागातील विशेषत: डोंगरी भागातील पोलीस निवासस्थाने व पोलीस ठाणे इमारतीसंदर्भात विविध प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून ते टप्प्याटप्प्याने सोडविण्यात येतील, अशी ग्वाही देऊन खानापूरसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या निर्मितीसाठी प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना केल्या.
फोटो - १३०१२०२१-विटा-मुंबई मिटींग :
ओळ : खानापूर येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या मंजुरीबाबत मंत्रालयात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी मंत्री बच्चू कडू, आ. अनिल बाबर, प्रकाश आबिटकर यांच्यासह पोलीस संचालक उपस्थित होते.