चारशे ते तेराशे रुपयांमध्ये फराळ पाठवा फॉरेनला, यंदा दरात १२ टक्के वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 12:23 PM2022-10-22T12:23:10+5:302022-10-22T12:23:45+5:30
परदेशातील नातलगांना, मित्रांना सांगलीतील घरच्या फराळाची गोडी चाखता यावी म्हणून कुरिअर कंपन्या व एजन्सीजनी ‘फराळ कुरिअर सेवा’ सुरू केली आहे
सांगली : कोणतेही निर्बंध नसल्याने यंदा सांगलीचा फराळ मोठ्या प्रमाणावर फॉरेनला जाण्याची शक्यता आहे. सध्या काही प्रमाणात यासाठी कुरिअर कंपन्यांकडे बुकिंग सुरु झाले आहे. यंदा कुरिअरच्या दरात १० ते १२ टक्के वाढ झाली असून साडेचारशे ते तेराशे रुपयांपर्यंत विविध देशातील पार्सल सेवेचे दर आहेत.
परदेशातील नातलगांना, मित्रांना सांगलीतील घरच्या फराळाची गोडी चाखता यावी म्हणून कुरिअर कंपन्या व एजन्सीजनी ‘फराळ कुरिअर सेवा’ सुरू केली आहे. ऑफर, सवलतींमुळे यंदा प्रतिसाद मिळत असून, अनेक देशांमध्ये सांगलीचा फराळ पाठविण्यास सुरुवात झाली आहे.
कोरोनाचे संकट दूर झाल्यामुळे जिल्ह्यात दिवाळीचा उत्साह वाढला आहे. बाजारपेठेत आनंदाला उधाण आले आहे. अलीकडे अवघ्या काही दिवसांत परदेशात फराळ पोहोच होतो. अमेरिकेसारख्या देशात चार ते पाच दिवसांत फराळ पाठविला जातो. गेल्या सहा दिवसांपासून यासाठी बुकिंग केले जात असून ,फराळ पाठविला ही जात आहे.
असे होते पॅकिंग
दिवाळीच्या फराळाला काळजीपूर्वक पॅकिंग करावे लागते. खाद्यपदार्थ फुटण्या-तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे बाॅक्समध्ये खालच्या बाजूस वजनास जड व वरील बाजूस हलके खाद्यपदार्थ ठेवले जातात. पॅकिंग केलेल्या अवस्थेत आहे तसे पदार्थ स्वीकारणाऱ्याला मिळतात.
पाठवण्याचा खर्च (वजनाच्या वर्गवारीनुसार)
देश ६ ते १० कि. ११ ते २० कि.
अमेरिका, कॅनडा ९०० ८७०
इंग्लंड ४८५ ४५५
जर्मनी ११४० १०९०
युएई ८१० ४२०
ऑस्ट्रेलिया १३३३ ११७४
सिंगापूर ४४३ ४३७
न्यूझिलंड १४११ १२८०
जास्त वजनाला कमी दर
पार्सलची वजनानुसार वर्गवारी केली जाते. ६ ते १०, ११ ते १५, १६ ते २० व २० ते २५ अशी वर्गवारी केली जाते. जास्त वजनाच्या पार्सलला कमी दर ठेवला आहे.
फराळ परदेशात पाठविण्यासाठी अद्याप फारसा प्रतिसाद नाही, पण दिवाळी आठवड्यावर असल्याने येत्या चार ते पाच दिवसांत बुकिंग वाढण्याची अपेक्षा आहे. यावेळी परवडणाऱ्या दरात व घरातून पार्सल स्वीकारण्याची सोय केली आहे. देशांतर्गत पार्सल सेवाही सुरु आहे. - प्रथमेश देशमुख, कुरिअर एजन्सी चालक