सांगलीत रस्त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:18 AM2021-06-22T04:18:28+5:302021-06-22T04:18:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : विश्रामबागमधील दत्तनगर परिसरात ड्रेनेज कामासाठी खोदलेल्या मुख्य रस्त्याची पावसामुळे दयनीय अवस्था झाली आहे. ...

Senior citizens' agitation for Sangli road | सांगलीत रस्त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे आंदोलन

सांगलीत रस्त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : विश्रामबागमधील दत्तनगर परिसरात ड्रेनेज कामासाठी खोदलेल्या मुख्य रस्त्याची पावसामुळे दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीची वारंवार मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ ज्येष्ठ नागरिकांनी जिल्हा सुधार समितीचे अध्यक्ष ॲड. अमित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन केले. महापालिकेने तातडीने या आंदोलनाची दखल न घेतल्यास अधिकाऱ्यांच्या दालनात चिखलफेक आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

दत्तनगर परिसरात ड्रेनेजसाठी खोदलेल्या रस्तावरील काम रेंगाळले आहे. पावसामुळे या रस्त्याची चाळण झाली आहे. ठेकेदाराने अधिकारी, नगरसेवकांसह आमदारांनाही ठेंगा दाखवला आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी महापालिका व ठेकेदार यांचा निषेध करत आंदोलन केले.

ॲड. शिंदे म्हणाले की, दत्तनगरमध्ये रस्त्याचे काम तत्काळ सुरू न झाल्यास रस्त्यावर साठलेला राडारोडा चिखल अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये नेऊन टाकला जाईल.

सुभाष तोडकर म्हणाले, गेले कित्येक महिने हे काम काम पूर्ण होण्यासाठी ठेकेदारासह नगरसेवक व आमदारांकडे पाठपुरावा करत आहोत. परंतु, ठेकेदाराने आमदार व नगरसेवकांनाही जुमानले नाही. त्यामुळे हे काम वेळेत होऊ शकले नाही. नुकत्याच झालेल्या पावसामुळे रस्त्याची अवस्था दयनीय झालेली आहे.

शांतीनाथ आवटी म्हणाले की, रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे चालणेही अवघड झाले आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रश्न सोडविण्याची गरज आहे. बाबासाहेब पाटील म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची वेळ येणे ही महापालिका प्रशासनासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.

यावेळी राजाराम दळवी, गोरख पाटील, संजय बनसोडे, पासगोंडा पाटील, डी. बी. माने, धनपाल रुईकर उपस्थित होते.

Web Title: Senior citizens' agitation for Sangli road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.