ज्येष्ठ नागरिकांनी भीती न बाळगता कोरोनावरील लस घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:48 AM2021-03-04T04:48:13+5:302021-03-04T04:48:13+5:30
नेर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रवींद्र बर्डे कोरोना लस घेताना सोबत डॉ. सागर शिंदे, सुभाष पाटील. लोकमत न्यूज नेटवर्क नेर्ले ...
नेर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रवींद्र बर्डे कोरोना लस घेताना सोबत डॉ. सागर शिंदे, सुभाष पाटील.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर्ले : नेर्ले, पेठ, कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत गावांतील ज्येष्ठ नागरिकांनी नेर्ले येथील सरकारी रुग्णालयात भीती न बाळगता कोरोना आजारावरील लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती रवींद्र बर्डे यांनी केले.
नेर्ले (ता. वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोरोना लसीकरणास प्रारंभ झाला. यावेळी बर्डे, पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष पाटील, नेर्ले ग्रामपंचायतीचे सदस्य माणिक पाटील यांनी कोरोना लस घेतली.
वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर शिंदे म्हणाले, ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षावरील व्याधीग्रस्त लोकांनाही लस देण्यात येणार असून त्यांनी व ज्येष्ठ नागरिकांनी येताना आधार कार्ड सोबत घेऊन यावे तसेच ४५ वर्षावरील व्याधीग्रस्त लोकांनी येताना डॉक्टरांचे व्याधीबाबतचे पत्र आणावे.
चौकट :
पती-पत्नींनी घेतली लस
नागरिकांनी न भीता लस घ्यावी या उद्देशाने रवींद्र बर्डे व शोभा बर्डे, सुभाष पाटील व शालन पाटील यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन लस घेतली.