ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रघुनाथतात्या केडगे यांचे निधन; सावळज येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 09:10 PM2018-09-05T21:10:39+5:302018-09-05T21:14:02+5:30

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रघुनाथ तिप्पान्ना केडगे (वय ९२, रा. गुलमोहर कॉलनी, सांगली) यांचे बुधवारी मिरज येथील खासगी रुग्णालयात वृध्दापकाळाने निधन झाले. सावळज (ता. तासगाव) या त्यांच्या मूळ गावी सायंकाळी अंत्यविधी करण्यात आले.

 Senior freedom fighter, Raghunathata Kedge passes away; Funeral in a mournful environment at Sawal | ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रघुनाथतात्या केडगे यांचे निधन; सावळज येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रघुनाथतात्या केडगे यांचे निधन; सावळज येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी

googlenewsNext

सांगली : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रघुनाथ तिप्पान्ना केडगे (वय ९२, रा. गुलमोहर कॉलनी, सांगली) यांचे बुधवारी मिरज येथील खासगी रुग्णालयात वृध्दापकाळाने निधन झाले. सावळज (ता. तासगाव) या त्यांच्या मूळ गावी सायंकाळी अंत्यविधी करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. तत्पूर्वी त्यांच्या इच्छेनुसार नेत्रदान करण्यात आले.

केडगेतात्या या नावाने ते सर्वत्र परिचित होते. विविध सामाजिक संस्थांशी त्यांचा संबंध होता. २००७ मध्ये क्रांतिदिनी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याहस्ते त्यांचा गौरव करण्यात आला होता. अत्यंत मितभाषी, निगर्वी आणि इतरांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर, अशी त्यांची ख्याती होती. २८ आॅगस्ट १९२७ रोजी त्यांचा जन्म झाला. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या भाषणांनी प्रेरित होऊन ते स्वातंत्र्य चळवळीत ओढले गेले. सातारा महाविद्यालयात शिक्षण घेणारे मित्र नरहरी चौगुले यांच्यामुळे ते सेवा दलाशीही जोडले गेले. लहानपणापासूनच क्रांतिगीते, प्रभातफेऱ्या, भूमिगत स्वातंत्र्यसेनानींना मदत, अशी कामे ते करीत असत. सायकलला कर्णा लावून ते जनजागृती करीत असत. १९४० च्या सुमारास सातारचे कलेक्टर सावळज दौºयावर येणार होते.

सावळजच्या शाळेत त्यांचा कार्यक्रम होणार होता. याची माहिती मिळताच तात्यांनी आपल्या सहकाºयांसह शाळेच्या खिडकीच्या काचा फोडून व गज कापून शाळेतील ब्रिटिशधार्जिणी चित्रे खरडून काढली होती. डोंगरसोनीच्या चावडीवर झेंडा फडकवून चावडीतील सहाव्या जॉर्जचे छायाचित्र रस्त्यावर भिरकावून दिले होते. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, स्वामी रामानंद भारती, वि. स. पागे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्योत्तर काळात काम केले. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या राजकीय वाटचालीत त्यांचा मोठा वाटा होता. आर. आर. पाटील यांचे राजकीय गुरु म्हणून ते ओळखले जात. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता रवींद्र केडगे, केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेंद्र केडगे, पोलीस उपअधीक्षक यशवंत केडगे आणि सुभाष केडगे ही त्यांची मुले अत्यंत वरिष्ठ पदांवर कार्यरत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर मिरज येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी दुपारी साडेबारा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सांगलीत गुलमोहर कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी झाली होती. तेथे काही वेळ त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी, विनायक सिंहासने, पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, चिक्कोडीचे माजी खासदार प्रकाश हुक्केरी, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख संदीप सुतार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

मिरजेचे तहसीलदार शरद पाटील यांनी प्रशासनातर्फे श्रध्दांजली वाहिली. काँग्रेस कमिटीसमोर माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी अभिवादन केले. यानंतर सायंकाळी सावळज (ता. तासगाव) या त्यांच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आले. यावेळी तासगावचे तहसीलदार दीपक वजाळे, कवठेमहांकाळच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माती सावडणे विधी शुक्रवार, दि. ७ रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे.
 

 

Web Title:  Senior freedom fighter, Raghunathata Kedge passes away; Funeral in a mournful environment at Sawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली