बालरंगभूमीचे जनक ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास शिदंगी कालवश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 08:38 AM2018-07-12T08:38:56+5:302018-07-12T08:43:15+5:30
शिंदगी याचे बालरंगभूमीवरचे योगदान बघून केशवराव दाते यांनी ‘बालरंगभूमीचे जनक ‘ अशी उपाधी दिली होती. शिंदगी यानी अनेक कथा, कविता, नाटके, स्फुट, बालगीते, एकांकिका, देशभक्तीपर गीते लिहिली आहेत. बालनाट्याबरोबरच त्यांचे व्यावसायिक नाटकांमध्ये मोठे योगदान आहे.
सांगली - बालरंगभूमीचे जनक म्हणून ओळख असणाऱ्या श्रीनिवास शिंदगी यांनी गेली 60 वर्ष बालनाट्य चळवळ अविरत चालू ठेवली होती. या चळवळीच्या माध्यमातून शेकडो बाल कलाकारांना अभिनयाचे आणि दिग्दर्शनाचे धडे दिले. शिंदगी यांनी लिहिलेली पुंगीवाला, एक मुंगी नेसली लुंगी, मिठाईचे घर, स्वर्गातील माळ, लाटूशेट वाटूळा, बोलका आरसा, भूमिपुत्रांचे वनपूजन, दहा लाखाचा धनी यासारखी अनेक बालनाट्ये गाजली. शिंदगी यांच्या मार्गदर्शनाखाली बालवयात अभिनयाचे धडे घेतलेले अनेकजण पुढे दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणू नावाजले गेले.
शिंदगी याचे बालरंगभूमीवरचे योगदान बघून केशवराव दाते यांनी ‘बालरंगभूमीचे जनक ‘ अशी उपाधी दिली होती. शिंदगी यानी अनेक कथा, कविता, नाटके, स्फुट, बालगीते, एकांकिका, देशभक्तीपर गीते लिहिली आहेत. बालनाट्याबरोबरच त्यांचे व्यावसायिक नाटकांमध्ये मोठे योगदान आहे. मराठी रंगभूमीवर पहिल्यांदा टेपरेकॉर्डरच्या सहायाने पार्श्वसंगीत देण्याचा प्रयोग शिंदगी यांनीच केला. त्यांच्या 'पुंगीवाला' बालनाट्याचे शेकडो प्रयोग झाले आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन सुलभा देशपांडे यांनी केले होते. पुंगीवाला हे बालनाट्य मुंबई दूरदर्शनवर प्रसारित होणारे पहिले बालनाट्य ठरले.
अनेक सामाजिक संस्थांच्या मदतीसाठी शिंदगी यांच्या अनेक बालनाट्याचे प्रयोग सादर करण्यात आले आहेत. श्रीनिवास शिंदगी यांनी आजवर 20 नाटके लिहिली त्यापैकी 15 बालनाट्ये आहेत. त्यांचे पुंगीवाला हे नाटक इतक्या उच्च अभिरुचीचे होते की ते ख्यातनाम अभिनेत्री सुलभा देशपांडे यांनी दिग्दर्शित केले. दरवर्षी सुट्ट्यांमध्ये शिंदगी यांनी लहान मुलांसाठी अभिनय वर्ग सुरु करून शेकडो बाल कलाकार गेल्या 60 वर्षापासून घडवले.
दहालाखाच्या धनी या नाटकाच्या वेळी शिंदगी यांनी टेपरेकॉर्डरच्या सहाय्याने संगीत या आधुनिक तंत्राचा पहिल्यांदा वापर केला. प्रख्यात अभिनेत्री व सौंदर्याचा आयटमबॉम्ब म्हणून ज्यांनी रंगभूमीवर व चित्रपटातून आपली ओळख निर्माण केली त्या पद्मा चव्हाण यांनी रंगमंचावर पहिली एन्ट्री याच नाटकातून घेतली होती हे विशेष. साहित्य, लेखन, अभिनय याच बरोबर श्रीनिवास शिंदगी यांनी देशभक्तीचे बाळकडू लहान मुलांमध्ये निर्माण करण्यासाठी गीतभारतम, हमारा वतन, वंदेमातरम हे राष्ट्रभक्तीपर गीतांचे कार्यक्रम तयार करून त्यांचे शेकडो प्रयोग राज्यभर केले आहेत. या कार्यक्रमाच्या ध्वनिफितीही तयार करण्यात आल्या आहेत. याबरोबरच लहान मुलांच्या मनोरंजनासाठी एक मुंगी नेसली लुंगी, जंगलगाणी, मिठाईचे घर, गणपतीबाप्पा क्रिकेट खेळूया याही ध्वनिफितींची त्यांनी निर्मिती केली.
शिंदगी यांनी सामाजिक जाणिवेचे भान जपत ‘भूमिपुत्रांचे वनपूजन' हे संगीतमय बालनाट्य लिहिले.
या बाल नाट्याला महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाड;मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे. गोवा- मुक्ती संग्रामातील क्रांतीकाराकांना त्यांनी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले. याबरोबरच सुधीर फडके यांच्या गीतारामायणाचा पहिला प्रयोग त्यांच्या सहकार्यामुळेच सांगलीच्या पांजरपोळ सभागृहात सादर करण्यात आला. शिंदगी यांनी बालकुमार साहित्य संमेलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. नटवर्य केशवराव दाते यांच्या प्रेरणेने शिंदगी यांनी सांगली येथे आद्य बाल रंगभूमीची स्थापना केली.