जेष्ठ तमाशा कलावंत राजा पाटील यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2022 01:22 PM2022-01-15T13:22:05+5:302022-01-15T13:22:22+5:30
गेली चाळीस वर्षे त्यांनी लोकनाट्य कलेची सेवा केली. ‘चाळ ते माळ’ हे आत्मचरित्र त्यांनी नुकतेच लिहून पूर्ण केले हाेते. लवकरच त्याचे प्रकाशन होणार हाेते.
कवठेमहांकाळ : ज्येष्ठ तमाशा कलावंत, विद्रोही शाहीर राजाराम यशवंतराव पाटील तथा शाहीर राजा पाटील (वय ७०) यांचे शुक्रवारी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
राजा पाटील संपूर्ण हयात लोककलेसाठी वाहून घेतली होती. ‘बारा हजाराची कमळी’, ‘तुकोबा निघाले वैकुंठाला’, ‘कवठेमहांकाळची लावणी’ या त्यांच्या साहित्यकृती विशेष गाजल्या. १९७० नंतर जे तमाशा फड उदयास आले, त्यातील गुलाब बोरगावकर, गणपत व्ही. माने-चिंचणीकर, दत्ता महाडिक, चंद्रकांत ढवळीकर, काळू-बाळू (कवलापूर) यासारख्या विविध तमाशा मंडळात त्यांनी तमाशा कलावंत, वगनाट्य लेखक, शाहीर, सरदार म्हणून काम केले.
त्यांनी ‘रक्ताची आन’, ‘आब्रूचा पंचनामा’ यासारखी नाटके लिहिली. ‘रक्तात न्हाली अब्रू’, ‘इंदिरा काय भानगड’, ‘डॉ. शर्मा’, ‘भक्त पुंडलिक’, ‘टोपीखाली दडलंय काय’, ‘भक्त दामाजी’, ‘खेकडा चालला दिल्लीला’, ‘बापू बिरू वाटेगावकर’ इत्यादी वगनाट्ये लिहिली. याशिवाय लोकशाहीर राजा पाटील लोकनाट्य मंडळाचे ते संस्थापक हाेते. ‘तुकोबा निघाले वैकुंठाला’ या पोवाड्याचे सादरीकरण त्यांनी केेले.
गेली चाळीस वर्षे त्यांनी लोकनाट्य कलेची सेवा केली. ‘विद्रोही तुकाराम’ हा त्यांचा एकपात्री प्रयोग महाराष्ट्रभर गाजला. ‘चाळ ते माळ’ हे आत्मचरित्र त्यांनी नुकतेच लिहून पूर्ण केले हाेते. लवकरच त्याचे प्रकाशन होणार हाेते.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे.