सांगली बाजार समितीसाठी स्वतंत्र ‘वसंतदादा पॅनेल’च, विशाल पाटील-जयश्रीताई पाटील एकत्र आल्याने संदिग्धता दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 04:28 PM2023-04-08T16:28:54+5:302023-04-08T16:52:57+5:30

दादा-वहिनी एकत्र आल्याने संदिग्धता दूर

Separate Vasantdada Panel for Sangli Bazar Committee | सांगली बाजार समितीसाठी स्वतंत्र ‘वसंतदादा पॅनेल’च, विशाल पाटील-जयश्रीताई पाटील एकत्र आल्याने संदिग्धता दूर

सांगली बाजार समितीसाठी स्वतंत्र ‘वसंतदादा पॅनेल’च, विशाल पाटील-जयश्रीताई पाटील एकत्र आल्याने संदिग्धता दूर

googlenewsNext

सांगली : जिल्हा पातळीवरील सर्व संस्थांमध्ये दादा घराण्याचे वर्चस्व होते; पण वसंतदादा घराण्यातील अंतर्गत कलहामुळे आमच्या कुटुंबासह कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यापुढे राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या आम्ही एकसंध राहणार आहे, अशी ग्वाही काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी वसंतदादा गटाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिली. वसंतदादा पॅनेल आणि दादा घराण्याच्या नेतृत्वातच सांगलीबाजार समितीची निवडणूक होईल. या पॅनेलमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

सांगलीत शुक्रवारी वसंतदादा भवनमध्ये वसंतदादा विचारांच्या कार्यकर्ते आणि नेत्यांची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.

वसंतदादा गटाची नऊ वर्षे अवहेलना

प्रकाशबापू, माजी मंत्री मदन पाटील यांच्या निधनानंतर गेल्या नऊ वर्षांपासून वसंतदादा गटाची जिल्ह्यात खूपच अवहेलना झाली आहे. यापुढे ती होणार नाही याची काळजी मी आणि विशाल पाटील घेणार आहे. कुठेही वसंतदादा गटाची फरफट होऊ देणार नाही, असा विश्वासही जयश्रीताई यांनी व्यक्त केला.

ताकदीने लढवणार

यापुढे होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत दादा गटाचे अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करू. विधानसभा, लोकसभा निवडणुकीत वसंतदादा यांच्या विचारांचा उमेदवार दिसला पाहिजे. आम्हाला कोण टार्गेट करतंय, कोण अडचणीत आणतंय हे दिसतंय, पण कार्यकर्त्यांच्या बळामुळे विरोधकांचे प्रयत्न अयशस्वी होतील, असे विशाल पाटील यांनी स्पष्ट केले.

भ्रष्ट कारभाऱ्यांना धडा शिकविणार

सांगली बाजार समितीचा गेल्या ६० वर्षांत चांगला कारभार चालू होता. भ्रष्टाचाऱ्यांच्या हातात बाजार समितीचा कारभार गेल्यामुळे ४० कोटींच्या ठेवीवर त्यांनी डल्ला मारल्यामुळे सर्व कारभार ठप्प झाला आहे. या भ्रष्ट संचालकांना यापुढे बाजार समितीत थारा दिला जाणार नाही. आघाडीचे कोण आमच्या बरोबर आले. तर त्यांचेही उमेदवार स्वच्छ प्रतिमेचे असतील. असे पाटील म्हणाले.

दादा-वहिनी एकत्र आल्याने संदिग्धता दूर

दादा-वहिनी एकत्र येत असल्याचे समजल्यानंतर सुरुवातीला संदिग्धता निर्माण झाली होती. मात्र, व्यासपीठावरील चित्रामुळे ती दूर झाल्याचे सदानंद कबाडगे यांनी सांगितले.
युती कुणाशीही करा. मात्र, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत दादा घराण्याचा उमेदवार दिसला पाहिजे. याशिवाय पदांसाठी येणाऱ्यांची निष्ठा तपासण्यात यावी, अशी मागणी काही कार्यकर्त्यांनी केली.

Web Title: Separate Vasantdada Panel for Sangli Bazar Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.