सांगलीतील मालिका, चित्रपटांची चित्रीकरणे गोवा, गुजरातला स्थलांतरित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 08:23 AM2021-05-28T08:23:40+5:302021-05-28T08:24:11+5:30
series, Cinema Shooting : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निर्बंध अधिक कडक केल्याने जिल्ह्यातील चित्रीकरणे गोवा आणि गुजरातला स्थलांतरित झाली आहेत. चित्रीकरणामुळे निर्माण होणारा रोजगार यामुळे थांबला आहे.
सांगली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निर्बंध अधिक कडक केल्याने जिल्ह्यातील चित्रीकरणे गोवा आणि गुजरातला स्थलांतरित झाली आहेत. चित्रीकरणामुळे निर्माण होणारा रोजगार यामुळे थांबला आहे.
गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात मालिका आणि चित्रपटांची चित्रीकरणे मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. विशेषत: मराठी वाहिन्यांवरील मालिका व लो बजेट चित्रपटांची चित्रीकरणे सातत्याने कुठे ना कुठे सुरू असायची. कोरोनाच्या पहिल्या लाटेत निर्बंधांचे पालन करत छायाचित्रण सुरू राहिले होते. दुसऱ्या लाटेत निर्बंध कडक झाल्यानंतर निर्मात्यांनी गाशा गुंडाळला.
गोवा, सिल्वासा, दिव, दमण आदी ठिकाणी स्थलांतर केले तेथे निर्बंध शिथील असल्याने तसेच निसर्गसौंदर्याची स्थळे भरपूर असल्याने चित्रीकरण सोयीचे ठरले.
चित्रीकरणासाठी आवडती डेस्टिनेशन्स
कृष्णा आणि वारणा नद्यांचा परिसर, ऐतिहासिक वाडे, देखणे फार्म हाऊस, दंडोबाच्या डोंगररांगा, वाळवा तालुक्यात लांबच लांब पसरलेली फूलशेती ही काही डेस्टिनेशन्स निर्मात्यांना आकर्षित करायची. मिरजेतील कृष्णा घाटावर मालिका व गाण्यांच्या अल्बमची छायाचित्रणे व्हायची. मिरजेचे भूतपूर्व संस्थानिक पटवर्धन सरकारांच्या बेडग रस्त्यावरील देवी भवनमध्ये, तर सुमारे वर्षभरापासून एका मराठी मालिकेचे छायाचित्रण सुरू होते. औदुंबर येथील दत्त देवस्थान, अंकलीतील ऐतिहासिक वाडे, कवठेएकंद येथील सिद्धनाथ मंदिर, सांगलीत मिशन कंपाैंड, बावाफन दर्गा ही चित्रीकरण स्थळे निर्मात्यांच्या आवडीची होती.