बांगलादेशी तरुणींच्या प्रकरणाची पोलिस प्रमुखांकडून गंभीर दखल, वेश्या व्यवसाय रॅकेटचा होणार पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 05:15 PM2022-12-30T17:15:51+5:302022-12-30T17:16:25+5:30
बांगलादेशपासून सांगलीपर्यंत साखळी
सांगली : नोकरीच्या आमिषाने बांगलादेशातून तरुणींना सांगलीत आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याच्या ‘लोकमत’मधील वृत्ताची पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी गंभीर दखल घेतली आहे. यात सामील असलेल्या प्रत्येकावर कारवाईच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार लवकरच या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कारवाई करणार आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
बांगलादेशातील तरुणींना हेरून त्यांना भारतात नोकरीच्या आमिषाने आणून आर्थिक व्यवहार केला जातो. नंतर त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जातो. सांगलीतील गोकुळनगर, स्वरूप टॉकिज परिसर येथील वेश्या व्यवसायातील काही घरमालकिणींनी त्यांना बनावट आधार कार्ड तयार करून दिले आहे. छाप्यात या तरुणी सापडल्याच तर असे आधार कार्ड पुढे करून त्यांना सोडवले जाते. हे संपूर्ण प्रकरण ‘लोकमत’ने उजेडात आणले आहे.
पोलिस अधीक्षक डॉ. तेली यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत यात सहभागी असलेल्या सर्वांवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. हे प्रकार कदापिही खपवून घेतले जाणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. त्यानुसार लवकरच तरुणींची पिळवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
पोलिस प्रमुखांच्या सुचनेप्रमाणे आता सांगलीतील पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. त्यांनी प्रकरणाच्या चौकशीस सुरुवात केल्याचे सांगण्यात आले.
रॅकेटचा होणार पर्दाफाश
बांगलादेशमधून नोकरीच्या आमिषाने भारतात तरुणींना आणत त्यांना थेट वेश्या व्यवसायात ढकलले जात आहे. यासाठी बांगलादेशपासून सांगलीपर्यंतची साखळी कायम आहे. याचविरोधात आता पोलिसांकडून कारवाई होणार आहे. कारवाईच्या भीतीने या तरुणींना अन्यत्र हलविण्यात आल्याचीही चर्चा आहे. मात्र, पोलिसांकडून कारवाई झाल्यास या संपूर्ण रॅकेटचा आता पर्दाफाश होण्याची अपेक्षा आहे.