सांगलीत नेमिनाथनगरला अत्याधुनिक नाट्यगृह उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 01:02 AM2018-11-06T01:02:27+5:302018-11-06T01:03:38+5:30
सांगली : महापालिकेला नगरोत्थान योजनेंतर्गत मंजूर शंभर कोटी रूपयांतून सांगलीतील नेमिनाथनगर येथे अत्याधुनिक नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. यासाठी १५ ...
सांगली : महापालिकेला नगरोत्थान योजनेंतर्गत मंजूर शंभर कोटी रूपयांतून सांगलीतील नेमिनाथनगर येथे अत्याधुनिक नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. यासाठी १५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय महापालिका हद्दीतील प्रमुख रस्ते, भाजी मंडई, विस्तारित भागात ड्रेनेज योजना आदी कामांसाठी या निधीतून तरतूद करण्यात आली असून, लवकरच या सर्व कामांचा आराखडा शासनाकडे सादर केला जाणार आहे.
महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली होती. या निधीतून केल्या जाणाऱ्या कामांचा आराखडा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सोमवारी नेमिनाथनगर येथील महापालिकेच्या खुल्या भूखंडाची पाहणी आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, गटनेते युवराज बावडेकर यांच्यासह नाट्यकर्मींनी केली. या खुल्या भूखंडावर अत्याधुनिक नाट्यगृह उभारले जाणार असल्याचे गाडगीळ यांनी स्पष्ट केले.
नेमिनाथनगर येथील अत्याधुनिक नाट्यगृहासाठी १५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ७०० आसन क्षमता असणारे हे नाट्यगृह जागतिक दर्जाचे असेल. शासनाच्या शंभर कोटींच्या निधीतून अत्याधुनिक नाट्यगृहाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे. याशिवाय सांगलीतील जुन्या गोकुळ नाट्यगृहाच्या जागेवर भाजी मंडई उभारण्यात येणार असून यासाठी ६ कोटींची तरतूद आहे.
सांगली, मिरज भुयारी गटार योजनेतील विस्तारित भाग, तसेच उपनगरांतील काही भागात ड्रेनेज व्यवस्था नाही. अशा ठिकाणी नवीन ड्रेनेज वाहिन्या टाकण्यासाठी १६ कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. याशिवाय शास्त्री चौक ते अंकली पोलीस चौकी, कर्नाळ पोलीस चौकी ते हरभट रोड, राम मंदिर ते स्टेशन रोड, महापालिका, मेन रोड यासह अन्य रस्त्यांच्या कामांचाही या निधीत समावेश आहे. मिरजेतील कामांमध्ये भाजी मंडई व ड्रेनेज योजनेचा समावेश आहे. कुपवाडमध्ये स्मशानभूमी, क्रीडांगण व भाजी मंडईचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
सांगलीला ६०, तर मिरजेला ४० कोटी
शासनाच्या शंभर कोटी रुपयांतून सांगली शहरात ६० कोटी, तर मिरज व कुपवाडला ४० कोटींची विकास कामे करण्यात येणार आहेत. सांगलीत १३, तर मिरज-कुपवाडमध्ये ७ प्रभाग आहेत. प्रत्येक नगरसेवकाला त्याच्या प्रभागातील विकास कामांसाठी ५० लाख रुपये मिळणार आहेत. या निधीतून करण्यात येणारी कामे सुचविण्याची सूचना महापौरांनी सर्व नगरसेवकांना केली आहे. त्यानुसार या कामांचे प्रस्ताव दाखल होत आहेत. उर्वरित निधीतून शहरातील प्रमुख समस्या मार्गी लावण्यात येणार आहेत.