उमदीत मोकाट फिरणारे सात बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:24 AM2021-04-26T04:24:21+5:302021-04-26T04:24:21+5:30
उमदी : उमदी (ता. जत) येथे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरले. रविवारी सकाळी पोलीस ...
उमदी : उमदी (ता. जत) येथे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरले. रविवारी सकाळी पोलीस पथकाने केलेल्या चाचणीत एकाच दिवशी ७ जण बाधित आढळले. त्यामुळे रिकामटेकड्या फिरणाऱ्यांवर जरब बसला आहे. दुपारनंतर गावातील रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला.
उमदीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने केलेल्या या मोहिमेचे नागरिकांतून स्वागत होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने निर्बंध लावलेले आहेत. या निर्बंधांचे पालन होताना दिसून येत नाही. उमदी येथे विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई व्हावी म्हणून उमदीचे पोलीस अधिकारी, आरोग्याधिकारी रस्त्यावर उतरले आहेत.
कोरोनाच्या साथीचे प्रमाण वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी सावध राहिले पाहिजे. नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये. गावातील प्रमुख चौकात, कट्ट्यावर, विनाकारण गप्पा मारत बसलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येईल, असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी दिला आहे.