बागणीत अकरा तलवारींसह सात कुकरी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:57 PM2018-07-16T23:57:58+5:302018-07-16T23:58:02+5:30
सांगली : बागणी (ता. वाळवा) येथे दुधगाव रस्त्यावरील शिकलगार शेतवस्तीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सोमवारी छापा टाकून घातक शस्त्रसाठा जप्त केला. यामध्ये ११ तलवारी व सात कुकरींचा समावेश आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अटक केलेल्यांमध्ये इमामुद्दीन बाबालाल शिकलगार (वय ४८), हारुण हामीद शिकलगार (३७, दोघे रा. मोमीन गल्ली, बागणी) व शब्बीर नरुद्दीन शिकलगार (२९, शिकलगार वस्ती, बागणी) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध बेकायदा हत्यार बाळगल्याप्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हवालदार युवराज पाटील यांनी फिर्याद दिली आहे. संशयितांना मंगळवारी न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. महापालिका निवडणुकीची धामधूम सुरु असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्याने खळबळ माजली आहे. त्यांनी हा शस्त्रसाठा कोठून व कशासाठी आणला? याबद्दल चौकशी सुरू असल्याचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी सांगितले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी खून, खुनाचा प्रयत्न, घरफोडी व दरोड्यातील गुन्हेगार तसेच बेकायदा हत्यार बाळगणाऱ्या संशयितांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी सकाळी निरीक्षक पिंगळे यांना बागणीत दुधगाव रस्त्यावर शिकलगार वस्तीवर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पिंगळे यांच्या पथकाने या वस्तीवर छापा टाकला. संशयित शब्बीर शिकलगार याच्या घरावर छापा टाकण्यात आला. छाप्याची चाहूल लागताच तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र तत्पूर्वीच त्यांना पकडण्यात आले. घराची झडती घेण्यात आली. त्यावेळी ११ तलवारी व सात धारदार कुकरी सापडल्या. हा शस्त्रसाठा पंचांसमोर जप्त करण्यात आला.
सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील, सहायक फौजदार राजू कदम, हवालदार युवराज पाटील, गजानन घस्ते, अमित परीट, राजू मुळे, सुनील लोखंडे, शशिकांत जाधव, सचिन कनप यांनी या कारवाईत सहभाग घेतला.