सात नगरसेवकांनी केला भाजपचा ‘गेम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:29 AM2021-02-24T04:29:03+5:302021-02-24T04:29:03+5:30

शेखर इनामदारांना रडू कोसळले महापौर व उपमहापौर निवडीसाठी भाजपचे नगरसेवक व नेते शहरातील एका मंगल कार्यालयात थांबून होते. तेथून ...

Seven corporators play BJP's 'game' | सात नगरसेवकांनी केला भाजपचा ‘गेम’

सात नगरसेवकांनी केला भाजपचा ‘गेम’

Next

शेखर इनामदारांना रडू कोसळले

महापौर व उपमहापौर निवडीसाठी भाजपचे नगरसेवक व नेते शहरातील एका मंगल कार्यालयात थांबून होते. तेथून सर्व नगरसेवक ऑनलाईन सभेत सहभागी झाले. आमदार सुधीर गाडगीळ, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे म्हैसाळकर, माजी आमदार दिनकर पाटील, शेखर इनामदार, सुरेश आवटी यांच्यासह नेतेमंडळीही तिथे उपस्थित होते. बहुमताच्या जादुई आकड्यापर्यंत पोहोचता आले नसल्याचे शल्य नेते मंडळींच्या चेहऱ्यावर दिसत होते. तरीही काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभेद होतात का? अशी आशा होती. पण ती फोल ठरली. महापालिकेतील सत्ता गेल्याचे स्पष्ट होताच भाजप नेत्यांचे चेहरे पडले. दीपक शिंदे यांनी भाजपच्या नगरसेवकांनी एकसंघ रहात चांगली लढत दिली असून आघाडीचा विजय अनैतिक असल्याचे सांगत दिलासा देण्याचा प्रयत्न केला. तर शेखर इनामदार यांनी गेल्या अडीच वर्षात महापालिकेचा प्रमुख म्हणून पारदर्शी कारभार करण्याचा प्रयत्न केला. माझ्या हातून काही चुका झाल्या असतील तर त्या माफ कराव्यात असे सांगतानाच प्रमुख पदाचा राजीनामाही देत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी इनामदार यांना रडू कोसळले.

चौकट

धीरज सूर्यवंशी यांची खिलाडू वृत्ती

भाजपच्या महापौर पदाचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांचा निवडणुकीत पराभव झाला. पण त्यांनी खिलाडू वृत्तीने हा पराभव स्वीकारला. सोशल मीडियावरून त्यांनी नूतन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना शुभेच्छाही दिल्या.

चौकट

भाजपमध्ये सन्नाटा

महापौर, उपमहापौर भाजपचाच होणार असा दावा करण्यात येत होता. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांत उत्साह होता. पण मंगळवारी सकाळपर्यंत सात नगरसेवक स्वगृही न परतल्याने भाजपमध्ये सन्नाटा पसरला होता. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयातही गर्दी नव्हती. दिवसभर भाजप नेत्यांनी माध्यमांना प्रतिक्रियाही दिल्या नव्हत्या.

चौकट

महापालिकेत पोलीस बंदोबस्त

या निवडीनिमित्त भाजप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत आधीच तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे निवडीच्या दिवशी पोलीस यंत्रण सतर्क होती. सकाळी दहा वाजल्यापासून पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पालिका मुख्यालयातही पोलिसांसोबत अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे सकाळपासूनच पालिका मुख्यालय ओस पडले होते.

Web Title: Seven corporators play BJP's 'game'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.