मोहिते वडगावात सात दिवसांचा कडक लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:26 AM2021-05-26T04:26:49+5:302021-05-26T04:26:49+5:30
विटा : मोहित्यांचे वडगाव (ता. कडेगाव) येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने गावात मंगळवार, दि. २५ पासून ...
विटा : मोहित्यांचे वडगाव (ता. कडेगाव) येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने गावात मंगळवार, दि. २५ पासून ७ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. किराणा दुकानांसह रात्रीचे दूध संकलन पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय ग्राम दक्षता समितीने घेतला.
मोहित्यांचे वडगाव येथे कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. एकेका घरातील चार ते पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
अशा परिस्थितीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गावात कडक लॉकडाऊन लावणे गरजेचे असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. त्यामुळे ग्राम दक्षता समितीचे अध्यक्ष सरपंच विजय मोहिते, ग्रामसेवक पी. बी. पाटील, गावकामगार तलाठी सोमेश्वर जायभाय, पोलीस पाटील विकास कुंभार यांच्या उपस्थितीत सोमवारी ग्राम दक्षता समितीच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत ७ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता किराणा दुकाने, शेती औषधांची दुकाने यासह सर्व व्यवहार सात दिवसांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. दूध संकलन केवळ सकाळी ७ ते ८ या वेळेत होणार असून, रात्री दूध संकलन केंद्रे पूर्णपणे बंद राहणार आहेत. यामुळे दूध उत्पादकांची मोठी अडचण निर्माण झाली असून, दूध व्यवसायावर संसार अवलंबून असणाऱ्या शेतकरी कुटुंबातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.