प्रवाशांचे पैसे घालायचे खिशात, शिवशाहीच्या सात चालकांना ड्युटी बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 05:56 PM2022-02-18T17:56:18+5:302022-02-18T18:22:18+5:30
सांगली ते स्वारगेट व मिरज ते स्वारगेट या प्रवासात विनातिकीट प्रवासी आणल्याचे निष्पन्न झाले
सांगली : प्रवाशांचे पैसे स्वत:च्या खिशात घालणाऱ्या शिवशाहीच्या सात चालकांना एसटी महामंडळाने ड्युटी बंदी केली आहे. पुण्यातील खासगी कंपनीचे हे चालक असून प्रवाशांना तिकीट न देताच वाहतूक केल्याचे आढळले आहे.
एसटी महामंडळामार्फत काही शिवशाही गाड्या खासगी तत्वावर चालविल्या जातात. त्यामध्ये गाडी व चालक संबंधित खासगी कंपनीचा असतो. गाडी सुटतानाच स्थानकात प्रवाशांना तिकीटे दिली जातात. फक्त चालक प्रवासी घेऊन वाहतूक करतो. गाडीत वाहक नसतो. प्रवासादरम्यान मध्येच प्रवाशांना उतरविण्याची परवानगी आहे, पण नवे प्रवासी स्थानकातच घ्यावे लागतात.
डिसेंबरमध्ये सांगली व मिरज आगारांतून पुण्याला धावणाऱ्या खासगी शिवशाही गाड्यांच्या तपासण्या महामंडळाच्या पथकाने केल्या, तेव्हा काही गाड्यांतील प्रवाशांकडे तिकिटे नसल्याचे आढळले. त्यांना विचारणा केली असता, चालकाने पैसे घेतल्याचे सांगितले. हे प्रवासी स्थानकात गाडीमध्ये चढले नव्हते, तर मध्येच हात दाखवून गाडी थांबविली होती.
अशा सात चालकांनी सांगली ते स्वारगेट व मिरज ते स्वारगेट या प्रवासात विनातिकीट प्रवासी आणल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सांगली विभागीय कार्यालयाने संबंधित ठेकेदार कंपनीला नोटीस काढली आहे.
बुधवारी (दि. १६) काढलेल्या नोटीशीत म्हंटले आहे की, यामुळे महामंडळाची प्रतिमा मलीन झाली आहे. विनातिकीट प्रवासी आणल्याने आर्थिक नुकसानही झाले आहे. त्यामुळे या सात चालकांना महामंडळाच्या कोणत्याही बसवर ड्युटीसाठी नियुक्त करु नये. तसे केल्यास, कंपनीवर कारवाईसाठी प्रस्ताव सादर केला जाईल. नोटीशीमध्ये संबंधित सात चालकांची नावेही दिली आहेत.