सात कारखान्यांची धुराडी बंद
By admin | Published: February 22, 2017 11:23 PM2017-02-22T23:23:46+5:302017-02-22T23:23:46+5:30
बेचाळीस लाख टन उसाचे गाळप : पन्नास लाख क्विंटल साखर उत्पादन
सांगली : जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी मागील तीन महिन्यात ४२ लाख टन उसाचे गाळप करून ५० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन साखर कारखान्यांकडून करण्यात आले आहे. उसाचा साखर उतारा सरासरी ११.८२ टक्के आहे.
उसाच्या कमतरतेमुळे महांकाली साखर कारखाना, वसंतदादा साखर कारखान्यासह सहा साखर कारखान्यांना हंगाम अर्धवटच उरकता घ्यावा लागला असून त्यांनी धुराडी बंद केली आहेत. उर्वरित कारखान्यांचे हंगामही आठवडाभर चालतील, अशी परिस्थिती आहे.
जिल्ह्यातील मागीलवर्षी उसाची पुरेशी लागवड झाली नाही. उसाची बिलेही वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकरी अन्य पिकांकडे वळला आहे. चार वर्षापूर्वी कर्नाटकातील ऊस महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणात येत होता. परंतु, कर्नाटक सीमाभागातही साखर कारखाने उभे राहिल्यामुळे, त्यांनाच तेथे ऊस कमी पडू लागला आहे.
यातच यावर्षी कर्नाटक राज्यातील साखर कारखान्यांनीही काट्यावर पैसे देऊन मोठ्याप्रमाणात जिल्ह्यातील ऊस पळविला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांना पुरेसा ऊसच उपलब्ध झाला नसल्यामुळे त्यांना निम्म्यातच कारखान्यांचे गळीत हंगाम उरकावे लागले.
जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी आतापर्यंत ४२ लाख टन उसाचे गाळप करून ५० लाख क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. गळीत हंगामामध्ये क्रांती कारखान्याने आघाडी घेतली असून त्यांनी आतापर्यंत पाच लाख ६९ हजार ८९० टन उसाचे गाळप केले आहे. त्यांनी सहा लाख ९३ हजार १७० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले असून, १२.३१ टक्के साखरेचा उतारा मिळाला आहे. राजारामबापू पाटील, साखराळे (ता. वाळवा) या कारखान्याने साडेचार टन उसाचे गाळप करून पाच लाख १५ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. उतारा सर्वाधिक १२.७५ टक्के मिळविला आहे. यामुळे कारखानदारीबराबेर ऊस उत्पादक ही अडचणीत सापडला आहे.
याचा परिणाम साखर उत्पादनाबरोबरच येथील ऊस उत्पादकांवर झाला आहे. यामुळे कारखानदारीवर असणारा शेतकरी अडचणीत सापडल्याचे चित्र सर्वत्र आहे. (प्रतिनिधी)
कारखान्यांचा बंद हंगाम
राजारामबापू साखर कारखान्याच्या ताब्यात असलेल्या जतच्या डफळे कारखान्यास तर दहा दिवसातच गळीत हंगाम बंद करावा लागला. त्यानंतर लगेचच खासदार संजयकाका पाटील यांच्या ताब्यातील नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत कारखान्याचा गळीत हंगामही सातच दिवसात बंद झाला. सांगलीतील वसंतदादा कारखाना महिन्यात, तर महांकाली (कवठेमहांकाळ), निनाईदेवी (दालमिया) कोकरूड, (ता. शिराळा), सद्गुरु श्री श्री शुगर राजेवाडी (ता. आटपाडी) या कारखान्यांना महिना ते दीड महिन्यात गळीत हंगाम उरकावा लागला. उर्वरित साखर कारखान्यांचा गळीत हंगाम फार दिवस चालेल अशी परिस्थिती नाही. येत्या पंधरा दिवसात गळीत हंगाम बंद होण्याची शक्यता आहे.