जिल्ह्यात दहा वर्षांत सात मुलींची हत्या

By admin | Published: January 6, 2017 11:12 PM2017-01-06T23:12:31+5:302017-01-06T23:12:31+5:30

बलात्कारानंतर कृत्य : माळवाडीच्या घटनेने जिल्हा हादरला; आरोपींना शिक्षा होऊनही गुन्ह्यांची मालिका

Seven girls murdered in the district in ten years | जिल्ह्यात दहा वर्षांत सात मुलींची हत्या

जिल्ह्यात दहा वर्षांत सात मुलींची हत्या

Next


सचिन लाड ल्ल सांगली
जिल्ह्यात खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी आणि दरोडा आदी गुन्ह्यांचा आलेख नेहमीच चढ-उताराचा राहिला आहे. पण गेल्या दहा वर्षांत तीन ते पंधरा वर्षे वयोगटातील मुलींना वासनेची शिकार बनवून त्यांचा खून केल्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे. माळवाडी (ता. पलूस) येथे गुरुवारी रात्री १४ वर्षाच्या मुलीला वासनेची शिकार करून तिचा अमानुष खून केल्याची घटना घडल्याने जिल्हा पुन्हा एकदा हादरून गेला आहे. आरोपींना कठोर शिक्षा होऊनही गुन्हे घडतच असल्याने पोलिस यंत्रणासुद्धा चक्रावून गेली आहे.
माधवनगर, कासेगाव, शिराळा, विटा, कवठेमहांकाळ, इस्लामपूर आणि आता माळवाडी या गावात तीन ते १५ वयोगटातील मुली वासनेच्या शिकार बनून बळी गेल्या आहेत. कासेगाव येथे चुलत मामाने चार वर्षाच्या बालिकेचा केस कापण्याचा बहाणा करून घरातून नेले. निर्जनस्थळी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिचा गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेतात पुरुनही टाकला होता. शिराळा येथील एक मुलगी सांगलीतील एका शाळेत शिकत होती. तिच्या मावस मामाने तिला नवीन कपडे खरेदी करण्याचा बहाण्याने शाळेतून दुचाकीवरुन नेले. तीन-चार ठिकाणी तो मुलीस दारूच्या दुकानात घेऊन गेला. तिथे त्याने अतिमद्य प्राशन केले. शिराळ्यात नेऊन बलात्कार करुन खून केला. विटा येथेही एका मुलीवर चौघांनी बलात्कार करुन खून करून तिचा मृतदेह विहिरीत फेकून दिला होता.
अनैसर्गिक संबंधातून तिघांचा खात्मा
अनैसर्गिक संबंधातून गेल्या पाच वर्षात तिघांचा खून झाला आहे. यामध्ये शिराळ्यात एका पैलवानाने गतवर्षी १५ वर्षाच्या मुलाचा जीव घेतला. अत्यंत गुंतागुंत व आव्हानात्मक बनलेल्या या गुन्ह्याचा पोलिसांनी चार दिवसात छडा लावला होता. या गुन्ह्यातील पैलवानास गेल्याच महिन्यात न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मिरजेत मुलानेच पित्याचा खून केला. मार्केट यार्डात भंगार गोळा करणाऱ्या तरुणांनी एका दिवाणजीला संपविले होते. दिवाणजीच्या खुनाचा तपास तब्बल पंधरा दिवस सुरु होता.
एकतर्फी प्रेमातून दोघींना संपविले
एकतर्फी प्रेमप्रकरणातून सांगली आणि मिरजेत दोन तरुणींचा भरचौकात भोसकून खून केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अनेकदा कुटुंबाची अब्रू जाऊ नये, यासाठी पोलिस मूळ कारण कागदावर घेत नाहीत. परिणामी आरोपीही शिरजोर होतात. खुनाच्या गुन्ह्यातून दोषमुक्त होण्यासाठी ते पीडित कुटुंबांवर दबाव आणून दहशत माजविण्याचा प्रयत्न करतात.
लहान मुलींना खाऊचे आमिष, एकतर्फी प्रेम, लग्नाचे आमिष या कारणातून जिल्ह्यात बलात्काराच्या घटना सातत्याने घडतात; पण बलात्कार केल्यानंतर गुन्हा लपविण्यासाठी संशयिताकडून पीडितांचा गळाच घोटला जात आहे. अलीकडे सातत्याने या घटना घडत असल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे.
दोघांना फाशी
शिराळा येथे सख्ख्या चुलत मामाने, तर कासेगाव येथे मावस मामाने भाचीवर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या घटनांमध्ये आरोपी दोन्ही मामांना जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या शिक्षेविरुद्ध आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात अपील केले होते. पण उच्च न्यायालयाने त्यांची फाशीची शिक्षा कायम केली आहे. चार वर्षांपूर्वी या दोन घटना घडल्या आहेत. अशा गुन्ह्यांत आरोपींना कडक शिक्षा होत असताना, पुन्हा गुन्हे होत असल्याने पोलिस यंत्रणाही चक्रावून गेली आहे.
पिंकीचा तपास ‘फाईलबंद’
इस्लामपुरात चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने पिंकीचा मृतदेह शेतात पुरला होता. तिच्यावर झालेला अत्याचार उघडकीस आला, पण या गुन्ह्याचा उलगडा करण्यात मात्र आजअखेर पोलिसांना यश आलेले नाही. तपासाची ही फाईल गेल्या १७ वर्षांपासून बंद आहे.
सामाजिक संघटना आक्रमक
जिल्ह्यात बलात्कार करून मुलींचा खून केल्याच्या घटना उघडकीस येताच शहरातील तसेच ग्रामीण भागातील सामाजिक संघटनांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. आरोपींच्या अटकेसाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलने छेडली आहेत. याचा परिणाम पोलिसांच्या तपासावर झाला.
तपासणीनंतर कलाटणी
बेपत्ता मुलींचे मृतदेह सापडल्यानंतर त्याची विच्छेदन तपासणी सांगली, मिरजेतील शासकीय रुग्णालयात करण्यात आली. या तपासणीत मुलींवर बलात्कार करुन खून केल्याचे स्पष्ट झाले. अशा खटल्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.
आतापर्यंत घडलेल्या घटना
माधवनगर येथेही अशाच दोन घटना घडल्या. यातील एका गुन्ह्यात पित्यानेच हे कृत्य केले होते. मृतदेह शेतात पुरला होता. एक वर्षानंतर ही घटना उघडकीस आली होती. संपूर्ण शेत नांगरले तरी मुलीचा मृतदेह सापडला नव्हता.
कवठेमहांकाळ तालुक्यातही प्रेमसंबंधातून एका अल्पवयीन तरुणीचा बलात्कार करुन खून केल्याची घटना घडली.
माळवाडीतही गुरुवारी रात्री १४ वर्षांच्या शाळकरी मुलीचा बलात्कार करुन खून केला.
एकतर्फी प्रेमप्रकरणातून सांगली आणि मिरजेत दोन तरुणींचा भरचौकात भोसकून खून केला

शिराळा येथील एक मुलीच्या मावस मामाने तिला शाळेतून नवीन कपडे खरेदी करण्याचा बहाणा करुन शिराळा येथे नेऊन बलात्कार करुन तिचा खून केला.
शिराळा येथील एक मुलीच्या मावस मामाने तिला शाळेतून नवीन कपडे खरेदी करण्याचा बहाणा करुन शिराळा येथे नेऊन बलात्कार करुन तिचा खून केला.
माधवनगर, कासेगाव, शिराळा, विटा, कवठेमहांकाळ, इस्लामपूर आणि आता माळवाडी या गावात ३ ते १५ वयोगटातील मुली वासनेच्या शिकार बनून बळी गेल्या. पोलिसांनी या घटनांचा तातडीने तपास केला होता.

Web Title: Seven girls murdered in the district in ten years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.