एरंडोलीतील सात लाखाच्या चोरीचा छडा

By Admin | Published: December 24, 2015 12:15 AM2015-12-24T00:15:50+5:302015-12-24T00:35:33+5:30

दोन गुन्हे उघडकीस : दोघांना अटक, दोन वाहनांसह नऊ लाखांचा ऐवज हस्तगत

Seven lacquer pirate in Erandoli | एरंडोलीतील सात लाखाच्या चोरीचा छडा

एरंडोलीतील सात लाखाच्या चोरीचा छडा

googlenewsNext

मिरज : मिरज ग्रामीण पोलिसांनी बुधवारी दोन सराईत गुन्हेगारांना अटक करून, एरंडोली (ता. मिरज) येथील हार्डवेअर दुकानातील सात लाखांची चोरी उघडकीस आणली. उमेश हिप्परकर (रा. घालवाड, ता. शिरोळ) व सतीश ऊर्फ सचिन महादेव रोडे (रा. एरंडोली, ता. मिरज) अशी त्यांची नावे असून, दोन गुन्ह्यांतील वाहने, पिस्तुलासह ९ लाख २७ हजाराचा ऐवज जप्त केला.
एरंडोली येथे दि. २६ नोव्हेंबर रोजी महेश दिनकर पाटील यांचे पाटील ट्रेडर्स हे हार्डवेअर साहित्य व शेती अवजारे विक्रीचे दुकान चोरट्यांनी फोडले. दुकानातील साहित्य, शेती अवजारे व पाटील यांच्या मालकीची पिकअप् जीप (क्र. एमएच १० झेड ९७६९) असा पावणेसात लाखाचा ऐवज चोरून नेला. पोलिसात फिर्याद दाखल झाल्यानंतर प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक विजयकुमार मराठे यांच्या पथकाने खंडेराजुरी येथील विशाल बाळासाहेब रूपनर यास चोरीच्या मोटारीसह ताब्यात घेतले. रूपनर याच्याकडे चौकशी केली असता, तो उमेश हिप्परकर याच्या टोळीत सहभागी होऊन चोऱ्या व घरफोडीचे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले. हिप्परकर व रोडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर, त्यांनी एरंडोलीत पाटील ट्रेडर्स हे दुकान फोडून चोरी केल्याची कबुली दिली. त्यांनी चोरलेली जीप व साहित्य असा पावणेसात लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
हिप्परकर याचे साथीदार रूपनर व अमोल आपटे यांनी म्हैसाळ रस्त्यावर कल्लाप्पा वनजोळ या अथणीतील वकिलास अडवून, पिस्तुलातून गोळीबार करीत त्याची मोटार जबरदस्तीने पळवून नेली. लूटमारीच्या उद्देशाने वकिलाचेही अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र वकिलाने स्वत:ची सुटका करवून घेतली होती. या प्रकरणातील रूपनरला चोरलेल्या मोटारीसह बारामती येथे ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून अडीच लाखाची मोटार हस्तगत करण्यात आली. या प्रकरणातील अमोल आपटे फरारी असल्याचे पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)


आरगला चंदन तस्करी : तिघांना अटक
आरग येथे अवैध चंदन तस्करी करणाऱ्या तिघांना पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २२ हजार ५०० रूपये किमतीचे नऊ किलो चंदन जप्त केले. मंगळवारी रात्री मोटारसायकलवरून चंदन घेऊन जाणाऱ्या तिघांना पोलिसांनी संशयावरून अडवले असता, त्यांच्याकडे अवैध चंदन सापडले. याप्रकरणी सूरज नजरूद्दीन नदाफ (वय २२), भास्कर भाऊ खंदारे (६०, रा. गौरवाड, ता. शिरोळ), नेताजी शिवाजी नाईक (३९, रा. आरग) या तिघांना अटक करण्यात आली. पोलीस कर्मचारी सागर आंबेवाडीकर यांनी तिघांविरूध्द मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.


पिस्तूल जप्त
म्हैसाळ रस्त्यावर वकिलाचे अपहरण व लूट प्रकरणातील विशाल रूपनरने वकिलास एअरगनचा धाक दाखविल्याचे पोलिसांना खोटे सांगितले होते. मात्र पोलिसांनी हिप्परकर व रोडे यांच्याकडे चौकशी केल्यानंतर, विशालने वकिलास लुटण्यासाठी खरे पिस्तूल वापरल्याचे निष्पन्न झाले. गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल पोलिसांकडून हस्तगत करण्यात आले आहे.

Web Title: Seven lacquer pirate in Erandoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.