कुचीमध्ये सात लाखांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:20 AM2021-07-18T04:20:14+5:302021-07-18T04:20:14+5:30
कवठेमहांकाळ : कुची (ता. कवठेमहांकाळ) येथे चोरट्यांनी घर फोडून सात लाख रुपये किमतीचे १४ तोळे सोन्याचे दागिने लंपास ...
कवठेमहांकाळ : कुची (ता. कवठेमहांकाळ) येथे चोरट्यांनी घर फोडून सात लाख रुपये किमतीचे १४ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना शुक्रवारी रात्री अकरा ते अडीचच्यादरम्यान घडली. याबाबत वैभव आत्माराम पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी : कुची येथील वैभव पाटील आणि कुटुंबीय शुक्रवारी रात्री झोपल्यानंतर अकरा ते अडीचच्यादरम्यान चोरट्यांनी काचेची खिडकी तोडली. त्यातून हात घालून वाळलेल्या उसाच्या साहाय्याने दाराची आतील कडी काढली व चोरटे आत शिरले. घरातील सर्वजण झोपल्याचा फायदा उचलून चोरट्यांनी घरातील लोखंडी तिजोरी फोडली व त्यातील १४ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. पाटील कुटुंबीय सकाळी उठल्यानंतर हा प्रकार लक्षात आला.
वैभव पाटील यांनी कवठेमहांकाळ पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहायक निरीक्षक राहुल कोलंबीकर, उपनिरीक्षक दीपाली गायकवाड, सुभाष चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली व पंचनामा केला. कवठेमहांकाळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.