सात लाखांची रोकड संशयितांकडून जप्त
By admin | Published: April 18, 2016 12:33 AM2016-04-18T00:33:16+5:302016-04-18T00:35:13+5:30
पेपरफुटी प्रकरण : अधिकाऱ्यास कोठडी
सांगली : जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेविका पदाच्या पेपर फुटीप्रकरणी अटकेत असलेल्या संजय कांबळे (रा. हरिपूर) व किरण कदम (रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ) यांच्याकडून अनुक्रमे तीन व दोन, अशी पाच लाखांची रोकड जप्त केली आहे. पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील यांच्या पथकाने शनिवारी रात्री उशिरा ही कारवाई केली. दरम्यान, अटकेत असलेला राधानगरी (जि. कोल्हापूर) पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी अभिजित पाटील यास रविवारी न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
संजय कांबळे हा कवलापूर (ता. मिरज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवक आहे, तर किरण कदम हा सांगली जिल्हा परिषदेत कनिष्ठ लिपिक आहे. गेल्या आठवड्यात त्यांना अटक केली होती. सध्या ते पोलिस कोठडीत आहेत. शनिवारी रात्री उशिरा एकाचवेळी पोलिसांच्या दोन पथकांनी त्यांच्या घरावर छापा टाकला. तासभर सुरू असलेल्या घराच्या झडतीत कांबळेच्या घरात दोन लाख, तर कदम याच्या घरात तीन लाखांची रोकड सापडली. ही रोकड जप्त करण्यात आली आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या मुद्रणालयातील कनिष्ठ बार्इंडर रामदास फुलारे याच्याकडून दोन लाखांची रोकड जप्त केली होती. सहा महिन्यांच्या तपासात दोन ‘डझन’ संशयितांना अटक झाली असली तरी, केवळ सात लाखांची रोकड जप्त झाली आहे. संशयितांनी ही रोकड उमेदवारांकडून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. अटकेतील विस्तार अधिकारी अभिजित पाटील याला रविवारी न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पेपर फुटीच्या साखळीत त्याचा ‘रोल’ काय होता, याची चौकशी सुरू असल्याचे उपअधीक्षक पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कागदपत्रे जाळली
भोसे (ता. मिरज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक मंदार मोहन कोरे (रा. हरिपूर) यालाही गेल्या आठवड्यात अटक केली होती. त्याच्याही घरावर छापा टाकण्यात आला; पण तत्पूर्वी त्याच्या घरच्यांनी घरामागे काही कागदपत्रे जाळल्याचे निष्पन्न झाले आहे. बऱ्याच वेळानंतर हा प्रकार पथकाच्या लक्षात आला. घराच्या झडतीत काही सापडले नाही; परंतु कोणती कागदपत्रे जाळली, याची चौकशी सुरू असल्याचे उपअधीक्षक पाटील यांनी सांगितले.