बॅंक खात्यावर सात लाख रुपये जमा झाले, सांगलीतील छायचित्रकाराने प्रामाणिकपणे परत केले

By संतोष भिसे | Published: September 27, 2024 05:23 PM2024-09-27T17:23:22+5:302024-09-27T17:27:20+5:30

सांगली : तुमच्या खात्यावर अचानक लाखो रुपये जमा झाले तर तुम्ही काय कराल? याचे उत्तर सांगलीतील मुक्त छायाचित्रकार रवी ...

Seven lakh rupees deposited in the bank account The cinematographer from Sangli returned honestly | बॅंक खात्यावर सात लाख रुपये जमा झाले, सांगलीतील छायचित्रकाराने प्रामाणिकपणे परत केले

बॅंक खात्यावर सात लाख रुपये जमा झाले, सांगलीतील छायचित्रकाराने प्रामाणिकपणे परत केले

सांगली : तुमच्या खात्यावर अचानक लाखो रुपये जमा झाले तर तुम्ही काय कराल? याचे उत्तर सांगलीतील मुक्त छायाचित्रकार रवी काळेबेरे यांनी कृतीद्वारे दिले. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या बॅंक खात्यात चक्क सात लाख रुपये जमा झाले, ते त्यांनी त्वरित बॅंकेला परत केले.

सात लाख जमा झाल्याचा मेसेज मोबाईलवर येताच एखाद्या फसव्या योजनेचा मेसेज असावा म्हणून काळेबेरे यांनी सुरुवातीला दुर्लक्षही केले. पण चौकशीअंती खरोखरच पैसे जमा झाल्याचे स्पष्ट झाले. एका राष्ट्रीयकृत बॅंकेच्या बेंगलुरु येथील शाखेतून तांत्रिक चुकीमुळे सांगलीतील काळेबेरे यांच्या खात्यामध्ये आले होते. त्यांनी शाखाधिकाऱ्यांना त्वरित माहिती दिली. शाखाधिकाऱ्यांनी बेंगलुरुमधील शाखेतून झाल्या प्रकाराची खातरजमा केली. काळेबेरे यांच्याकडून धनादेशाद्वारे पैसे परत घेतले. बेंगलुरु शाखेने त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल अभिनंदनाचे अणि धन्यवादाचे पत्र पाठविले.

सांगलीत सराफ कट्ट्यावर सहकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी सराफ समितीचे अध्यक्ष जितेंद्र पेंडूरकर, भाजप नेते पृथ्वीराज पवार, रवी यांच्या मातोश्री विमल, सुनील पिराळे, सुधाकर नार्वेकर, सावकार शिराळे, गजानन पोतदार, चंद्रकांत मालवणकर, सुरेश जाधव, राजू कासार, संजय काळेबेरे, संजय मोहिते, विनायक साळुंखे, अशोकराव मालवणकर, बळीराम महाडिक, अशोक बेलवलकर आदी उपस्थित होते.

तासाभराचे लखपती

काळेबेरे यांच्या खात्यात सात लाख जमा झाल्यानंतर बॅंकेत जाऊन पैसे परत करेपर्यंत तासाभराचा वेळ गेला. त्यामुळे काळेबेरे तासाभराचे का होईना, लखपती ठरले.

असाही अप्रामाणिकपणा

दरम्यान, याच बॅंकेत एका खातेदाराच्या खात्यात दोन वर्षांपूर्वी ७६ हजार रुपये तांत्रिक चुकीमुळे वळते झाले. बहाद्दराने पैसे लगेच काढून घेतले. खर्चही केले. बॅंकेच्या पाठपुराव्यानंतर २५-३० हजार रुपये परत केले. उर्वरित पैशांच्या वसुलीसाठी बॅंकेचे अधिकारी हात धुवून त्याच्या मागे लागले आहेत, पण तो पैसे परत करण्याचे नाव घेत नाही. या पार्श्वभूमीवर काळेबेरे यांचा प्रामाणिकपणा उजळून निघाला आहे.

Web Title: Seven lakh rupees deposited in the bank account The cinematographer from Sangli returned honestly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.