‘वसंतदादा’च्या प्रशासनाकडून सत्तर लाखांचा गैरव्यवहार - संजय कोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 12:42 AM2018-05-03T00:42:32+5:302018-05-03T00:42:32+5:30
सांगली : वसंतदादा साखर कारखान्याकडे २०१३-१४ या गळीत हंगामासाठी ऊस पाठविलेल्या शेतकऱ्यांची आठ कोटींची थकबाकी आहे.
सांगली : वसंतदादा साखर कारखान्याकडे २०१३-१४ या गळीत हंगामासाठी ऊस पाठविलेल्या शेतकऱ्यांची आठ कोटींची थकबाकी आहे. ती देण्यासाठी श्री दत्त इंडिया शुगरने कारखाना प्रशासनाकडे अडीच महिन्यापूर्वी अडीच कोटी रुपये दिले होते. त्यापैकी एक कोटी ८५ लाख रुपयांची शेतकऱ्यांची बिले दिली असून उर्वरित ७० लाख रुपये कारखान्याच्या कर्जासाठी भरले आहेत. हा गैरव्यवहार असल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या सहकार आघाडीचे राज्याध्यक्ष संजय कोले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
ते म्हणाले की, श्री दत्त इंडिया शुगरने पहिला हंगाम यशस्वीपणे चालविला आहे. दत्त इंडियाकडे २०१३-१४ वर्षातील आठ कोटींची ऊस उत्पादकांची बिले थकीत आहेत. ते देण्यासाठी शेतकरी संघटना आणि शेतकºयांनी रेटा लावल्यामुळे दत्त इंडियाने आठ कोटींपैकी दोन कोटी ५५ लाख रुपयांची रक्कम वसंतदादा कारखान्याकडे अडीच महिन्यांपूर्वी दिली होती. वसंतदादा कारखाना प्रशासनाने सहा गटातील शेतकºयांना केवळ एक कोटी ८५ लाख रुपयेच वाटप केले आहेत. उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना देण्याऐवजी कारखाना प्रशासनाने बँक खाते एनपीएतून बाहेर काढण्यासाठी वापरली आहे. यामुळे या सहा गटातील शेतकरी थकीत बिलापासून वंचित राहिले आहेत.
याबद्दल सहकारमंत्री आणि साखर आयुक्तांकडे तक्रार करण्यात येणार आहे, असेही संजय कोले यांनी सांगितले.
‘वसंतदादा’कडून गैरव्यवहार नाही : मृत्युंजय शिंदे
श्री दत्त इंडिया शुगरने वसंतदादा कारखान्याला २०१३-१४ च्या गळीत हंगामात ऊस घातलेल्या शेतकºयांची थकीत बिले देण्यासाठी दोन कोटी ५५ लाख ७८ हजार रुपयांची रक्कम दिली होती. त्यापैकी बहुतांशी पैसे शेतकºयांना वाटप झाले असून, काही शेतकºयांनीच बिले नेली नसल्यामुळे त्यांच्याकडे ती रक्कम शिल्लक दिसत आहे. परंतु, ती रक्कम कारखान्याच्या खात्यावरच शिल्लक आहे. ‘त्या’ रकमेचा कोणताही गैरव्यवहार वसंतदादा प्रशासनाने केलेला नाही. मिरज, सांगली गटातील शेतकºयांनी बिल नेले नसेल, तर अन्य गटातील शेतकºयांना ते पैसे वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी प्रतिक्रिया श्री दत्त इंडिया शुगरचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे यांनी दिली.
संस्था पुनर्विकास निधीच्या नावाखाली लूट
वसंतदादा साखर कारखान्याची २०१३-१४ हंगामामध्ये २१४० रुपये एफआरपी होती. या दराने बिल देण्याऐवजी संस्था पुनर्विकासच्या नावाखाली प्रतिटन १४० रुपये कपात करुन पावत्या दिल्या जात आहेत. शेतकºयांकडून पुन्हा ही रक्कम परत न करण्याच्या अटीवर देत असल्याचे लेखी लिहून घेतले जात आहे. वसंतदादा कारखान्याने संस्था पुनर्विकास निधीच्या नावाखाली शेतकºयांची लूट सुरू केली असून, तीही बेकायदेशीर आहे, असेही संजय कोले म्हणाले.