जिल्ह्यात सात नवीन कोविड रुग्णालये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:27 AM2021-05-12T04:27:35+5:302021-05-12T04:27:35+5:30
सांगली : जिल्ह्यातील आरग (ता.मिरज), ढालगाव (ता.कवठेमहांकाळ), विटा, वांगी (ता.कडेगाव), चिकुर्डे (ता. वाळवा), माडग्याळ (ता.जत) आणि जत अशा सात ...
सांगली : जिल्ह्यातील आरग (ता.मिरज), ढालगाव (ता.कवठेमहांकाळ), विटा, वांगी (ता.कडेगाव), चिकुर्डे (ता. वाळवा), माडग्याळ (ता.जत) आणि जत अशा सात ठिकाणी २६५ ऑक्सिजन बेडची कोविड रुग्णालये सुरू करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. यापैकी विटा, आरग, वांगी, माडग्याळ येथे ती सुरू केली आहेत.
ग्रामीण भागामध्ये कोविड रुग्णालये सुरू करावीत, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी कोविड रुग्णालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी जिल्हा क्रिडा संकुल येथील कोविड रुग्णालय यशस्वी चालविल्यामुळे नवी रुग्णालये उभा करण्यापासून ती चालविण्याची जबाबदारी त्यांच्यावरच सोपविली आहे. माडग्याळ येथे ४० बेड, जतला १०० बेड, चिकुर्डे, आरग, ढालगाव, विटा, वांगी येथे प्रत्येकी २५ बेडचे काेविड रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. सात ठिकाणचे सर्व २६५ बेड ऑक्सिजन सोययुक्त असणार आहेत. आरग, विटा, वांगी, माडग्याळ येथील कोविड रुग्णालये चालू केली आहेत. ढालगाव, चिकुर्डे येथे बुधवारपासून चालू होणार आहेत. जत येथे १०० बेडचे रुग्णालय करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याची जागा निश्चित झाली आहे, असे गुडेवार यांनी सांगितले.
चौकट
आरोग्य केंद्रासह कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती
या रुग्णालयांत आरोग्य केंद्रातील डॉक्टर, आरोग्यसेविकांची नियुक्ती केली जाणार आहे. माडग्याळ येथे ग्रामीण रुग्णालयातच कोविड रुग्णालय सुरू आहे. डॉक्टर आणि शंभर आरोग्यसेविकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलिंद पोरे यांनी दिली.