सांगली जिल्ह्यातील सात रुग्ण कोरोनामुक्त; पंधरा दिवसांनी आला अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 04:17 PM2024-01-10T16:17:28+5:302024-01-10T16:18:19+5:30
सांगली : राज्याच्या अनेक भागांत कोरोनाच्या जेएन-१ विषाणूचे रुग्ण आढळत असताना, सांगली जिल्ह्यातही या विषाणूने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले. ...
सांगली : राज्याच्या अनेक भागांत कोरोनाच्या जेएन-१ विषाणूचे रुग्ण आढळत असताना, सांगली जिल्ह्यातही या विषाणूने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले. पंधरा दिवसांपूर्वी कोरोना संशयित आढळलेल्या १२ रुग्णांपैकी सात जण जेएन-१ बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये महापालिका क्षेत्रातील पाच रुग्णांचा समावेश होता. पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेतून आरोग्य विभागाला अहवाल प्राप्त झाला, परंतु जेएन-१ विषाणूचे सातही रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २६ वर पोहोचली.
गत महिन्यांपासून काही जिल्ह्यात कोरोनाचा नवा विषाणू जेएन - १ हा आढळून आला होता, परंतु सांगली जिल्ह्यात कोरोनाचे नियमित रुग्ण आढळले होते. दि. २० ते २७ डिसेंबर, २०२३ या दरम्यान १२ रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आले होते. आढळून आलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांपैकी सात रुग्णांचे नमुने कोविड १९ चा उपप्रकार शोधण्यासाठी एनआयव्ही, पुणे येथे पाठविण्यात आले होते.
त्याचा अहवाल सोमवार, दि. ८ रोजी राज्य कार्यालयाकडून प्राप्त झाला. सात रुग्णांमध्ये कोविड १९ या आजाराचा जेएन-१ या उपप्रकाराचा विषाणू असल्याचे असल्याचे आढळून आले. या सातपैकी सहा नमुने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथून पाठविण्यात आले होते. त्यामध्ये पाच महापालिका क्षेत्रातील रुग्ण असून, एक रुग्ण ग्रामीण भागातील आहे.
जेएन-१ विषाणूचे सहा रुग्ण ५० ते ८० या वयोगटांतील असून, एका रुग्णाला मधुमेह आहे. पाच रुग्ण घरीच किरकोळ उपचार घेऊन बरे झालेले आहेत, तर मध्यम स्वरूपाच्या लक्षणामुळे ८० वर्षांचा एक वृद्ध सांगली येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेऊन बरा झालेला आहे. ग्रामीण भागातील अजून एक रुग्ण कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये न्यूमोनियाच्या उपचाराकरिता दाखल झाला होता.
या रुग्णाचा नमुना उपप्रकारासाठी पाठविला असता, जेएन-१ हा उपप्रकार असल्याचे आढळून आले आहे. सातही रुग्ण सध्या उपचार घेऊन बरे झाले असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. वातावरणातील बदलामुळे मागील काही दिवसांपासून साथीच्या रोगाचा प्रसार झाला आहे. ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले असल्याने प्रशासनाने संशयित रुग्णांची कोरोना चाचणी सुरू केली आहे. जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २६ वर पोहोचली आहे.