मंगेश चव्हाणसह सातजणांवर गुन्हा
By admin | Published: July 5, 2015 01:18 AM2015-07-05T01:18:18+5:302015-07-05T01:19:21+5:30
पाचजणांचा अटक : चांदणी चौकात मारामारी
सांगली : येथील चांदणी चौकात दोन गटात झालेल्या मारामारीप्रकरणी दोन्ही गटाने तक्रार देण्यास नकार दिल्याने पोलिसांनीच पुढे येऊन स्वत: फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार युवक काँग्रेसचा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष मंगेश चव्हाणसह सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील पाचजणांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची जामिनावर सुटकाही झाली आहे.
अटक केलेल्यांमध्ये धनेश भगवान शेटे (वय ५१), मिलिंद धनेश शेटे (२०), आनंद धनेश शेटे (२३, तिघे रा. वखारभाग), महेश मारुती चव्हाण (३०, आंबेडकर रोड, चव्हाण प्लॉट) व अभिजित रामचंद्र गायकवाड (३०, शाहू उद्यानसमोर सांगली) यांचा समावेश आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या मंगेश चव्हाण व रवी खत्री यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. चांदणी चौकात शेटे व चव्हाण यांच्या दोन गटात शुक्रवारी रात्री जोरदार मारामारी झाली होती. काठी व दगडांचा वापर करण्यात आला होता. यामध्ये दोघे जखमी झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले होते. त्यानंतर दोन्ही गटाने पलायन केले होते. दोन्ही गट तक्रार देण्यासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गेले होते, पण पुन्हा त्यांच्यात समझोता झाल्याने त्यांनी तक्रार देण्यास नकार दिला होता.
मारामारीचा घडलेला हा प्रकार गंभीर होता. त्यामुळे पोलिसांनी स्वत: त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पोलीस कर्मचारी संतोष तुकाराम डामसे यांची फिर्याद घेऊन मंगेश चव्हाण, धनेश शेटेसह सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)