सांगलीत सात पिस्तूलांसह काडतुसे, नशेच्या गोळ्या जप्त; सहा जणांना अटक, कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 12:25 PM2023-05-08T12:25:43+5:302023-05-08T12:25:50+5:30
सांगली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करत सात पिस्तूल, १७ जिवंत काडतुसे, २२८ नशेच्या गोळ्या, ...
सांगली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करत सात पिस्तूल, १७ जिवंत काडतुसे, २२८ नशेच्या गोळ्या, गांजा असा नऊ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
शांताराम बसवंत शिंदे (वय ३७, रा. आसंगी तुर्क, जत), सौरभ रवींद्र कुकडे (२४, रा. दत्तनगर, कर्नाळ रोड, सांगली), राहुल सतीश माने (३०, रा. माजी सैनिक वसाहत, मिरज), वैभव राजाराम आवळे (२५, रा. हडको काॅलनी, मिरज), सुरेश लक्ष्मण राठोड (४२, रा. आलियाबाद, विजयपूर, कर्नाटक), सुरेश संभाजी महापुरे (२५, रा. दिघंची, ता. आटपाडी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील अवैध शस्त्रे, अमली पदार्थ, नशेच्या गोळ्या विकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षकांनी दिले होते. त्यानुसार पोलिस अधीक्षक डाॅ. बसवराज तेली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला सूचना केल्या. एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी कारवाईसाठी सहायक निरीक्षक संदीप शिंदे व निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके नियुक्त केली होती.
संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथक सांगली शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना शांताराम शिंदे याने सौरभ कुकडे याला पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे दिल्याची माहिती मिळाली. पथकाने कुकडे व शिंदे या दोघांना छत्रपती शिवाजी क्रीडांगणाच्या पार्किंगमध्ये ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पिस्तूल व तीन काडतुसे जप्त करण्यात आली. मिरजेतील मित्र राहुल माने याच्याकडून पिस्तूल घेऊन कुकडे याला दिल्याचे शिंदेने सांगितले.
पथकाने राहुल मानेचा शोध सुरू केला. तो मिरजेतील माजी सैनिक वसाहत येथे नशेच्या गोळ्या व गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून माने याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, दोन पिस्तूल, पाच काडतुसे, २२८ नशेच्या गोळ्या, १२१८ ग्रॅम गांजा सापडला. त्याने नशेच्या गोळ्या मुंबईतील बच्चूभाई (रा. भायखळा) याच्याकडून आणल्याची कबुली दिली. त्याच्याविरुद्ध मिरजेतील महात्मा गांधी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.