आष्टा येथील सातजणांना कोठडी
By admin | Published: December 9, 2014 11:02 PM2014-12-09T23:02:35+5:302014-12-09T23:26:34+5:30
व्यापाऱ्यांची फसवणूक : नोंदी, नूतनीकरणाच्या बोगस पावत्या
आष्टा : आष्टा शहरात दुकाने नोंदी व नूतनीकरणाकरिता माऊली फाऊंडेशन इस्लामपूर व शिवाजी पवार दादा शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्थेकडून बोगस पावत्यांद्वारे व्यापाऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक व संस्थेच्या पावती पुस्तकावर शासनाच्या राजमुद्रेचा वापर करून फसवणूक करणाऱ्या सात आरोपींना आष्टा पोलिसांनी अटक करून इस्लामपूर न्यायालयासमोर उभे केले असता, सातही संशयितांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
लोकशासन आंदोलनाचे पश्चिम विभाग उपसंघटक व स्वराज्य माझा प्रतिष्ठानचे राज्य उपाध्यक्ष शामराव कुंडलिक क्षीरसागर (वय ५९, रा. इस्लामपूर), संदीप शहाजी देसावळे (२६, बहाद्दूरवाडी), संजय पांडुरंग गायकवाड (३८, येलूर), अभिजित पांडुरंग मेढे (रा. अभियंतानगर, इस्लामपूर), राहुल दादाराव डोरले (२७, इस्लामपूर), विजय सर्जेराव मिसाळ (१९, कामेरी), अलोक अशोक रांजवणे (२२, कामेरी) यांनी माऊली फाऊंडेशन व शिवाजी पवार दादा शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने दुकान नोंदणी व नूतनीकरणाकरिता बोगस पावती पुस्तके छापली.
या पावत्यांवर शासनाच्या राजमुद्रेचा वापर करून शहरातील दुकानदारांकडून ५0 रुपये फॉर्म फी घेऊन पावती देऊन व्यापाऱ्यांची लाखोंची फसवणूक करण्यात आली.
यावेळी पोलीस उपअधीक्षक आरती बनसोडे म्हणाल्या की, याबाबत न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. सर्व आरोपींना पोलीस कोठडी मिळेल अशी आशा होती. मात्र तसे घडले नाही. यापुढे व्यापाऱ्यांनी आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. (वार्ताहर)
आॅनलाईनसाठीही पैसे
शामराव क्षीरसागर याने फौंडेशनच्यावतीने अन्न भेसळबाबत आॅनलाईन पैसे भरण्याकरिता ९५० रुपये घेतले असून, ५०० रुपये शासन फी, २०० रुपये संबंधित कॉम्प्युटर सेंटर चालक व २५० रुपये स्वत:च्या संस्थेकरिता घेतल्याची माहिती समोर येत आहे.