जिल्ह्यात सात दुय्यम निबंधक, विवाह नोंदणी कार्यालये बंद
By admin | Published: November 30, 2015 11:10 PM2015-11-30T23:10:09+5:302015-12-01T00:13:42+5:30
कोटीचे नुकसान : विलासराव जगताप यांची कारवाईची मागणी
जत : जतसह सांगली जिल्ह्यातील सात दुय्यम निबंधक व विवाह नोंदणी कार्यालये मागील चार दिवसांपासून बंद आहेत. प्रत्येक दिवशी सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. कार्यालय बंद ठेवणारे आणि बंद करण्याचा आदेश देणाऱ्या या दोन्ही अधिकाऱ्यांकडून झालेली नुकसानभरपाई शासनाने वसूल करावी, अशी मागणी आमदार विलासराव जगताप यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली.जिल्ह्यातील तासगाव, विटा, पलूस, इस्लामपूर, कडेगाव, जत, कुपवाड येथील कार्यालये मागील चार दिवसांपासून बंद आहेत. तेथील नोंदणी अधिकारी व कर्मचारी यांना राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याच्या कामासाठी सांगली येथे पाठविण्यात आले आहे. यासंदर्भात कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही अथवा प्रशासनाने कोणतीही पर्यायी व्यवस्था करून कार्यालय सुरू ठेवले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून किंवा परगावाहून खरेदी-विक्री व्यवहार करण्यासाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली आहे.प्रत्येक कार्यालयाकडून प्रति दिवस सरासरी एक ते दीड लाख रुपये व सात कार्यालयाचे एकत्रित मिळून सुमारे एक कोटी रुपये उत्पन्न शासनाला मिळत आहे. कार्यालय बंद ठेवून कार्यालयाला कुलूप लावल्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊन शासनाचे आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीस सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त जबाबदार आहेत. त्यांनी आपल्या अधिकारात या सर्व अधिकाऱ्यांना सांगली येथे थांबून काम करण्याचे आदेश दिले आहेत, असेही जगताप यांनी सांगितले. (वार्ताहर)
चौकशी करा..!---सांगली जिल्ह्यातील सर्वच दुय्यम निबंधक कार्यालये जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली येतात. परंतु त्यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता व त्यांचा लेखी आदेश नसताना आयुक्तांनी स्वत:च्या अधिकारात त्यांना सांगली येथे कामासाठी ठेवून घेतले आहे. बेकायदेशीररित्या कार्यालयास कुलूप लावून कार्यालय बंद ठेवणे व नागरिकांची गैरसोय करणे आणि शासनाचे आर्थिक नुकसान करणे या गंभीर घटना आहेत. याप्रकरणी संबंधितांची शासनाने चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जगताप यांनी केली.