हळदीला सात ते साडेपंधरा हजार दर

By admin | Published: January 21, 2015 10:38 PM2015-01-21T22:38:23+5:302015-01-21T23:49:50+5:30

सांगलीत सौद्यांना प्रारंभ : एक फेब्रुवारीपासून रोजच सौदे निघणार

Seven to three-and-a-half times | हळदीला सात ते साडेपंधरा हजार दर

हळदीला सात ते साडेपंधरा हजार दर

Next

सांगली : येथील मार्केट यार्डमध्ये आज (बुधवार) हळदीच्या सौद्यांना प्रारंभ झाला. आज दिवसभर निघालेल्या हळदीच्या सौद्यामध्ये हळदीला सात हजार ते १५ हजार ५०० प्रति क्विंटल असा दर मिळाला. आता हळदीचे सौदे १ फेब्रुवारीपासून दररोज निघणार असल्याची माहिती चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष मनोहर सारडा यांनी दिली. आज सकाळी साडेनऊच्या मुहूर्तावर गणपती जिल्हा संघामध्ये हळदीच्या सौद्यांना ज्येष्ठ हळद व्यापारी जमनादासभाई ठक्कर यांच्याहस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष मनोहर सारडा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मनोहर माळी, सचिव प्रकाश पाटील, अशोक पाटील, सुनील पट्टणशेट्टी, बी. एल. पाटील, बंकटलाल मालू, उत्तम शहा यांच्यासह चेंबरचे पदाधिकारी, अडते, हमाल, मापाडे आदी उपस्थित होते. पेड (ता. तासगाव) येथील शेतकरी रहीम शिकलगार यांनी आणलेल्या पंधरा पोती हळदीच्या सौद्यातून हळदीच्या सौद्यांना प्रारंभ करण्यात आला. त्यांची हळद पुष्पक ट्रेडिंग कंपनीचे मुकेशभाई पटेल यांनी खरेदी केली. त्यांना प्रति क्विंटल १२ हजार १११ रुपये दर मिळाला. आज दिवसभरात मार्केट यार्डमध्ये अडीचशे पोत्यांचे सौदे काढण्यात आले. यामध्ये किमान सात हजार रुपये, तर कमाल १५ हजार ५०० रुपये दर मिळाला. आज साडेपंधरा हजार रुपये मिळालेला दर हा गेल्या वर्षभरातील उच्चांकी दर आहे. साडेपंधरा हजार रुपयांना एकाच क्विंटलची विक्री झाली. आज हळद सौद्यांना प्रारंभ झाला असला तरी, प्रत्यक्षात १ फेब्रुवारीपासून हळदीच्या सौद्यांना नियमितपणे सुरुवात होणार आहे. १ तारखेपासून हळदीचे सौदे आता सोमवार ते शनिवार असे दररोज निघणार आहेत. यावर्षी हळदीची आवक चांगली होणार असून यंदाच्या हंगामात बारा ते तेरा लाख पोत्यांची आवक होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. सांगलीमध्ये हळदीचा हंगाम आता जूनअखेरपर्यंत चालण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
वजनाची मर्यादा-- आजपासून हळद पोत्यांवर वजनाची मर्यादा घालण्यात आली आहे. मार्केट यार्डमध्ये हळदीचे पोते ७० किलोच्या वर न स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मनोहर सारडा यांनी दिली. अडत्यांनी यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहनही त्यांनी केले. आज सौद्यांना प्रारंभ झाल्यामुळे ७० किलोवरील पोती स्वीकारण्यात आली. यापुढे शेतकऱ्यांना याची कल्पना देण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्याचेही आवाहन केले आहे.

Web Title: Seven to three-and-a-half times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.