सात वर्षांच्या धनश्रीने अडीच तासांत सर केले कळसूबाई शिखर; सांगलीतील ४० गिर्यारोहकांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 19:02 IST2025-03-08T19:02:34+5:302025-03-08T19:02:34+5:30

सह्यगिरी ॲडव्हेंचर्सची मोहीम

Seven year old Dhanashree Bandgar summits Kalsubai Peak in two and a half hours 40 mountaineers from Sangli included | सात वर्षांच्या धनश्रीने अडीच तासांत सर केले कळसूबाई शिखर; सांगलीतील ४० गिर्यारोहकांचा समावेश

सात वर्षांच्या धनश्रीने अडीच तासांत सर केले कळसूबाई शिखर; सांगलीतील ४० गिर्यारोहकांचा समावेश

बुधगाव : महाराष्ट्राचे एव्हरेस्ट अशी ओळख असलेल्या १६४६ मीटर उंचीचे कळसूबाई शिखर बुधगाव (ता. मिरज) येथील सातवर्षीय धनश्री वैभव बंडगर हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत २ तास ३५ मिनिटांमध्ये सर केले. सांगलीतील सह्यगिरी ट्रेक अँड ॲडव्हेंचर्स ग्रुपच्या या मोहिमेत ४० गिर्यारोहक सहभागी झाले होते.

या ग्रुपच्यावतीने दरवर्षी तीन, चार मोहिमा आयोजित केल्या जातात. दिवाळी ते मे अखेर या कालावधीत दरवर्षी या मोहिमा होतात. यंदा मागील मंगळवारी या ग्रुपची ही मोहीम पार पडली. यामध्ये बुधगाव येथील तासगाव पंचायत समितीत क्रीडा मार्गदर्शक असणारे समिती वैभव बंडगर सात वर्षांच्या धनश्री या लेकीसह सहभागी झाले होते.

उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन, मंगळवार दि. ४ मार्च रोजी पहाटे साडेतीन वाजता या मोहिमेला पायथ्याच्या मंदिरापासून सुरुवात झाली. धनश्रीसह तिची मैत्रीण अवनी सरगर (वय, ९ वर्षे), ५६ वर्षांच्या हेमलता गायकवाड, ग्रुपचे मार्गदर्शक वैभव बंडगर, प्राध्यापक अजित पाटील, अथर्व यादव आदी ४० जण या मोहिमेत सहभागी झाले होते.

वडिलांची प्रेरणा !

वैभव बंडगर यांनी महाराष्ट्रातील गड, किल्ल्यांसह कर्नाटक, राजस्थान,जम्मू— काश्मीर, आसाममध्येही गिर्यारोहण आणि भ्रमंती केली आहे. त्यांचीच प्रेरणा घेऊन, धनश्रीने या मोहिमेत पहिल्या पाच जणांच्या ग्रुपसह २ तास ३५ मिनिटांत मोहीम फत्ते केली.

Web Title: Seven year old Dhanashree Bandgar summits Kalsubai Peak in two and a half hours 40 mountaineers from Sangli included

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली