प्रेमप्रकरणातून सातवेच्या तरुणाचा मांगलेतील मारहाणीत मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:33 AM2021-09-10T04:33:07+5:302021-09-10T04:33:07+5:30

मांगले : प्रेमप्रकरणातून मांगले (ता. शिराळा) येथे झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सातवे (ता. पन्हाळा) येथील महाविद्यालयीन तरुणाचा रुग्णालयात ...

Seventh young man beaten to death in a love affair | प्रेमप्रकरणातून सातवेच्या तरुणाचा मांगलेतील मारहाणीत मृत्यू

प्रेमप्रकरणातून सातवेच्या तरुणाचा मांगलेतील मारहाणीत मृत्यू

Next

मांगले : प्रेमप्रकरणातून मांगले (ता. शिराळा) येथे झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सातवे (ता. पन्हाळा) येथील महाविद्यालयीन तरुणाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. मोन्या ऊर्फ शिवतेज विनायक घाटगे (वय १८) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी शिराळा पोलिसांनी भाऊसाहेब बाजीराव दळवी, सौरभ भाऊसाहेब दळवी, पतंग विलास दळवी, अजय विजय दळवी (सर्व सातवे, ता. पन्हाळा) यांना पेठनाका (ता. वाळवा) येथे अटक केली.

शिवतेज घाटगेचे सातवेतीलच युवतीसोबत प्रेमप्रकरण होते. त्यातून दोघे सहा महिन्यांपूर्वी पळून गेले होते. याची नोंद कोडोली पोलिसात झाली होती. त्यानंतर हे प्रकरण मिटवले होते. बुधवारी सायंकाळी शिवतेज मांगले येथे दीपक हांडे यांच्या टेम्पोतून म्हैस सोडण्यासाठी आला होता. या वेळी युवतीचे नातेवाईक असलेल्या संशयितांनी अडवून दांडक्यांनी व लोखंडी गजाने जबर मारहाण केली. या वेळी मांगले येथील काही तरुणांनी त्याला गाडीवर बसवून सावर्डे-मांगले बंधाऱ्याजवळ नेले व तेथे जॅकवेलजवळ त्याला टाकून निघून गेले. याची माहिती मिळताच शिवतेजच्या नातेवाईकांनी धाव घेऊन त्याला कोल्हापूरमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र पहाटे त्याचा मृत्यू झाला. संशयितांनी पाळत ठेवून त्याला मारहाण केल्याचा आरोप शिवतेजचे चुलते संदीप ज्ञानदेव घाटगे यांनी केला.

मृत शिवतेजच्या नातेवाईकांनी संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला अखेर करवीरचे पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी त्वरित कारवाईचे आश्वासन दिल्याने सायंकाळी शिवतेजवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या खून प्रकरणाने सातवे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. संशयित व मृताच्या घरापुढे पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

चौकट

स्थानिक राजकारणात सक्रिय

शिवतेज याने गोठा प्रकल्प करून त्यात चांगला जम बसवला होता. स्थानिक राजकारणातही तो सक्रिय झाला होता. त्याच्या वडिलांचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्याच्या पश्चात आई, काका, आजी असा परिवार आहे.

चौकट

पाच महिन्यांपूर्वी पोक्सोअंतर्गत गुन्हा

शिवतेजवर कोडोली पोलिसांत पाच महिन्यांपूर्वी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल आहे. अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केली होती. त्याला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात रवानगी केली होती. तेव्हापासून त्याला व कुटुंबाला वारंवार त्रास दिला जात होता. स्थानिक पातळीवर या प्रकरणावर तडजोडीने पडदा टाकण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला.

Web Title: Seventh young man beaten to death in a love affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.