Women's Day Special: वयाच्या सत्तरीतही ‘ती’ची खेळांमध्ये सुवर्णपदकांची लयलूट; सांगलीतील वर्षा कुलकर्णी यांचा प्रेरणादायी प्रवास
By अविनाश कोळी | Updated: March 8, 2025 17:23 IST2025-03-08T17:21:16+5:302025-03-08T17:23:24+5:30
मुलीने म्हटले, ‘बाहेर राहून सल्ले देण्यापेक्षा पाण्यात उतरून बघ’. लागलीच त्यांनी वयाच्या चाळिशीत जलतरणाचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली

Women's Day Special: वयाच्या सत्तरीतही ‘ती’ची खेळांमध्ये सुवर्णपदकांची लयलूट; सांगलीतील वर्षा कुलकर्णी यांचा प्रेरणादायी प्रवास
अविनाश कोळी
सांगली : मनात प्रबळ इच्छाशक्ती अन् मैदानात उतरण्याची जिद्द असेल तर कोणत्याही वयात कोणत्याही क्षेत्रात भरारी घेता येते. सांगलीच्या गावभागातील सत्तर वर्षीय क्रीडापटूने ही गोष्ट अधोरेखित करीत जलतरण, सायकलिंग, धावणे व उंच उडी यासारख्या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदकांची लयलूट सुरु ठेवली आहे.
सांगलीच्या गावभागातील विसावा चौकात राहणाऱ्या वर्षा वसंत कुलकर्णी यांची ही कहाणी महिलांसाठी प्रेरणादायी आहे. मूळच्या सांगलीच्या असणाऱ्या वर्षा कुलकर्णी यांचे सासर पुणे. पती पोलिसांत होते, त्यामुळे त्यांच्या निमित्ताने त्यांना सांगलीत रहावे लागले. शालेय जीवनात त्यांना खेळाची आवड होती. मात्र, लग्नानंतर साऱ्या आवडींना पूर्णविराम लागला होता. वयाची चाळिशी गाठल्यानंतर एकदा जलतरण शिकणाऱ्या त्यांच्या मुलीसोबत त्या गेल्या होत्या. त्यावेळी नदीकाठावर बसून सल्ला देणाऱ्या आईला मुलीने म्हटले, ‘बाहेर राहून सल्ले देण्यापेक्षा पाण्यात उतरून बघ’. लागलीच वर्षा कुलकर्णी यांनी वयाच्या चाळिशीत जलतरणाचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. अल्पावधीत पोहणे शिकल्यानंतर त्यांनी मुलीसोबत स्पर्धेत भाग घेण्यास सुरुवात केली.
पाण्यात उतरल्यानंतर त्यांनी कधी बक्षीस मिळविले नाही, असे झाले नाही. सलग २० राज्यस्तरीय अन् १८ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्णपदकांची लयलूट केली. मालवण, रत्नागिरी येथील जलतरण स्पर्धांमध्ये वयोवृद्धांच्या गटात त्यांनी अनेक बक्षिसे जिंकली. नाैसेनेच्या कुलाबा येथील ६ किलोमीटर जलतरण स्पर्धेत त्यांनी तिसरा क्रमांक पटकाविला. जलतरणासह त्यांनी सायकलिंग, धावणे, उंच उडी या प्रकारातही बक्षिसे जिंकली. वयाच्या सत्तरीतही दररोज दहा किलोमीटर सायकलिंग व जमेल तितका धावण्याचा सराव त्यांचा सुरू असतो. मॅरेथॉन स्पर्धांमध्येही त्यांचा सहभाग लक्षवेधी असतो. छत्रपती संभाजीनगर येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या लांब उडीच्या स्पर्धेतही त्यांनी सुवर्णपदक मिळविले.
महापुराच्या पाण्यालाही आव्हान
महापुराच्या पाण्यातून सांगली ते हरिपूर, सांगली ते मिरज असे अंतर कापत पोहण्याची किमयाही त्यांनी अनेकवेळा केली. महापुराच्या काळात लोकांना मदत करण्यातही त्या अग्रेसर राहिल्या.
लेझिमच्या पथकातही ऊर्जा
लेझिम खेळाला फार ऊर्जा लागते. वयाच्या सत्तरीत आजही वर्षा कुलकर्णी यांचा विसावा मंडळाच्या लेझिम पथकात सर्वात वयोवृद्ध खेळाडू म्हणून ऊर्जावान सहभाग असतो.
प्रशिक्षण अन् प्रशिक्षक
शिवकालीन लाठी-काठी, तलवारबाजीचे प्रशिक्षण त्या घेत आहेत. दुसरीकडे जलतरण प्रशिक्षक म्हणून त्या रोटरीच्या स्विमिंग केंद्रात कार्यरत आहेत.