शिराळ्यात तीव्र दुष्काळ, तरीही मदत नाही
By admin | Published: April 11, 2016 11:21 PM2016-04-11T23:21:36+5:302016-04-12T00:37:13+5:30
४५ गावे ५० पैसेवारीपेक्षा कमी : शासनाच्या भूमिकेवर शेतकरी नाराज
विकास शहा -- शिराळा
शिराळा तालुक्याला पहिल्यांदाच मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. शासनाची नजर पैसेवारी, सुधारित पैसेवारी आणि अंतिम पैसेवारी झाली. अंतिम पैसेवारीत ४५ गावे ५० पैसेवारीपेक्षा कमी आहेत. मात्र शासनाकडून अद्याप एकही पैशाची मदत या गावांना मिळालेली नाही. शासन येथील शेतकरी आत्महत्या करणार तेव्हाच जागे होणार काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
या तालुक्यातील वारणा काठ सोडला, तर सर्व गावात दुष्काळी परिस्थिती आहे. खरीप गेला, रब्बी हंगामही गेला. शासनाने प्रथम दि. १५ सप्टेंबर रोजी नजर पैसेवारी (अंदाजे) केली. ३१ आॅक्टोबर रोजी सुधारित पैसेवारी केली. याचबरोबर १५ डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी केली. या पैसेवारीसाठी भात पीक ग्राह्य धरण्यात आले होते. अनेक तालुक्यात नजर पैसेवारी शासनाचा निधी आला आहे.
मात्र या तालुक्यातील शिरसी, आंबेवाडी, धामवडे, कोंडाईवाडी, टाकवे, बांबवडे, पाचुंब्री, भैरेवाडी, पणुंंब्रे तर्फ शिराळा, घागरेवाडी, गिरजवडे, शिवारवाडी, निगडी, औंढी, करमाळे, चरण, नाठवडे, मोहरे, आरळा, येसलेवाडी, भाष्टेवाडी, बेरडेवाडी, सोनवडे, मणदूर, गुढे, मानेवाडी, पाचगणी, काळुंद्रे, खराळे, चिंचेवाडी, करुंगली, मराठवाडी, पणुंबे तर्फ शिराळा, कुसळेवाडी, कदमवाडी, किनरेवाडी, कुसाईवाडी, शिंदेवाडी, येळापूूर, गवळेवाडी, मेणी, रांजणवाडी, सावंतवाडी, शिरसटवाडी, हातेगाव या ४५ गावांची आणेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे. मात्र अद्याप या गावांना एक रुपयाचीही मदत शासनाकडून मिळालेली नाही.
शासनाने या गावांना त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे. तसेच आता आणखी अनेक गावात सध्या पीक, पाणी स्थिती भयानक झाली आहे. त्यामुळे या गावांचा पुन्हा सर्व्हे करावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करित आहेत.
राज्यकर्त्यांचा पाठपुरावा कमी
शिराळा तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे बहुतांशी भागामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. खरिपाबरोबर रब्बी हंगामातील पिकेही वाया गेली आहेत. शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीच पडले नाही, तरीही शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून गावे घोषित केली नाहीत. याकडे तालुक्यातील राज्यकर्त्यांचेही प्रयत्न कमी पडल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.